(रत्नागिरी)
बारसू येथील जागा 133 परप्रांतियांना विकून पैशाची मस्ती चढलेल्या पंढरीनाथ आंबेरकर याने रिफायनरी गेली तर आपले अब्जोपती होण्याचे स्वप्न भंग होईल यासाठीच पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या केली आहे. या प्रकारणात जे-जे आंबेरकरला मदत करतील त्या सर्वांवर गुन्हे दाखल करुन हे हत्या प्रकरण सीबीआयकडे देण्याची मागणी रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी केली. मंगळवारी त्यांनी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी शिवसेनेचे उपनेते, आमदार डॉ. राजन साळवी उपस्थित होते.
मंगळवारी सायंकाळी खासदार विनायक राऊत यांनी पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांची भेट घेऊन हत्येतील आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली. पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या करण्यापूर्वी पंढरीनाथने अशाच प्रकारच अपघात केला होता. तर न्यायालयाच्या आवारात मारहाण करणे, तसेच रिफायनरी विरोधकांना ठोकून काढण्याच्या भाषा याने केल्या होत्या. त्याप्रमाणेच तो वागतही होता. शशिकांत वारिशे यांची हत्या हा पूर्वनियोजित कटच होता. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी पोलीस अधिक्षकांकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले.
पंढरीनाथ आंबेरकर हा रिफायनरीचा भूमाफिया होता. दहा-बारा जणांचे टोळके घेऊन बारसू पंचक्रोशीतील पाच गावांमध्ये दहशत पसरवून स्थानिकांच्या जागा बळकावल्या होत्या. त्याच जागा परराज्यातील 133 धनदांडग्यांना विकण्यात आल्या आहेत. प्रकल्पाचे नोटीफिकेशन झाल्यानंतर त्या भागातील जागेचा कोणताही खरेदी-विक्रीचा व्यवहार करता येत नाही. अत्यावश्यक कामासाठी जागा विकायची असेल तर जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी बंधनकारक आहे. परंतु बारसू येथील जागा अजुनही विक्री होत आहे. यामागे कोणाचा हात आहे याचीही चौकशी होणे आवश्यक असल्याचे राऊत यांनी सांगितले.
विरोध करतील त्यांना संपावयाचे असा एककलमी कार्यक्रम पंढरीनाथ आंबेरकर याच्यासह त्याच्या टोळक्याने सुरू केला होता. त्यातूनच पत्रकार शशिकांत वारिशे यांचा हकनाक बळी गेला. सिंधुदुर्ग येथे आलेल्या उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिफायनरी होणारच अशी गर्जना देऊन समर्थन करणाऱ्या या टोळक्याला अप्रत्यक्षरित्या प्रोत्साहन दिले होते. त्यामुळेच पंढरीनाथ आंबेरकरसारख्या गुंडाने एका पत्रकाराला मारण्याचे धाडस केले. यापुढे गुंडांना पाठीशी घातलात तर याद राखा असा इशारा राऊत यांनी दिला आहे.
दिवंगत पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या कुटुंबियांना खासदार म्हणून आपण व शिवसेनेने मदत केली आहे. आम्ही मदतीचा डांगोरा पिटणारे नाहीत, आम्ही स्वतःच्या खिशात हात घालूनच मदत करतो. परंतु सरकारने जाहीर केलेली 25 लाखांची मदत वारिशे कुटुंबांना कधी मिळणार माहित नाही. परंतु ही मदत सरकारने तात्काळ देणे आवश्यक आहे. स्वतःच्या खिशात हात न घालता सरकारी मदत तरी वेळेवर द्या, असा टोला राऊत यांनी पालकमंत्री उदय सामंत यांना लगावला.
या पत्रकार परिषदेला सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडीक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा अॅड. अश्विनी आगाशे, काँग्रेस प्रदेश सरचिटणीस श्रीमती रूपाली सावंत, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे उपस्थित होते.