(मुंबई)
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात ‘एनसीबी’चे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या कार्यपद्धतीवर ‘एनसीबी’च्याच दक्षता समितीने ठपका ठेवला. आर्यनला सोडविण्यासाठी २५ कोटी रुपये मागितल्याचा आणि ५० लाख रुपये घेतल्याचा आरोप समीर वानखेडे आणि त्यांच्या पथकावर करण्यात आला. त्यातच आता सीबीआयने चौकशीचा फास आणखी आवळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार समीर वानखेडे यांच्यानंतर सीबीआयचे पथक मंगळवारी समीर वानखेडे यांची बहीण आणि वडिलांचीही चौकशी करणार आहे.
दक्षता समितीच्या अहवालाच्या आधारे ‘सीबीआय’ने समीर वानखेडे, ‘एनसीबी’चे तत्कालीन अधीक्षक विश्व विजय सिंग, गुप्तचर अधिकारी आशिष रंजन यांच्यासह के. पी. गोसावी आणि सॅनविल डिसोझा या दोन व्यक्तींवर गुन्हा दाखल केला असून, सीबीआयमार्फत या गुन्ह्याचा तपास सुरू आहे. त्यातच आता समीर वानखेडे यांच्या भोवती फास आवळला जात असून, आता त्यांची बहीण आणि वडिलांचीही चौकशी केली जात आहे. उद्या (मंगळवारी) सकाळी १० वाजता समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे आणि त्यांची बहीण दोघेही सीबीआय कार्यालयात सीबीआय चौकशीसाठी जाणार आहेत. ज्या सीबीआयच्या पथकाने समीर वानखेडे यांची चौकशी केली, तेच पथक आज समीर वानखेडे यांची बहीण आणि वडिलांची चौकशी करणार आहे.
आर्यनच्या सुटकेसाठी वानखेडे यांनी २५ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली, अशा आरोपाखाली ‘सीबीआय’ने एफआयआर नोंदवला. या प्रकरणी समीर वानखेडे यांची सीबीआयच्या पथकाने सुमारे आठ-दहा तास चौकशी केली. त्यानंतर वानखेडे यांनी सीबीआयविरोधात याचिका दाखल केली. न्यायालयाने वानखेडे यांना चौकशीत सहकार्य करण्याचे निर्देश देऊन ८ जूनपर्यंत अंतरिम संरक्षण दिले होते.
माझ्या जीवाला धोका
भ्रष्टाचार आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यामुळे अडचणीत आलेले ‘एनसीबी’चे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी आपल्या जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे. अतिक अहमदप्रमाणे माझे बरेवाईट केले जाऊ शकते असे सांगतानाच त्यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त फणसळकर यांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी विशेष पोलिस संरक्षण देण्याची मागणी केली आहे.