(मुंबई)
राज्यात प्रचंड गाजलेल्या फोन टॅपिंग प्रकरणी वादग्रस्त ठरलेल्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना सशस्त्र सीमा दलच्या महासंचालकपदी पदोन्नती देण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून यासंबंधी आदेश जारी करण्यात आले आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर शिंदे-फडवणीस सरकार सत्तेत आलं. त्यानंतर रश्मी शुक्ला यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती होणार असल्याची चर्चा होती. मात्र त्यांनी केंद्रीय प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात आले होते.
रश्मी शुक्ला शुक्ला सध्या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर हैदराबादमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अतिरिक्त महासंचालक म्हणून कार्यरत होत्या. आता त्यांना बढती देण्यात आली असून त्यांची नियुक्ती सशस्त्र सीमा दलाच्या महासंचालपदी करण्यात आली आहे. रश्मी शुक्ला यांचा सशस्त्र सीमा दलाच्या महासंचालक पदाचा कार्यकाळ ३० जून २०२४ पर्यंत असणार असल्याचे केंद्र सरकारच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
भाजप-शिवसेना युतीचे सरकार असताना रश्मी शुक्ला यांच्यावर विरोधी पक्षाच्या नेत्यांचे फोन टॅपिंग केल्याचा आरोप होता. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर रश्मी शुक्ला यांच्याकडूनच माहिती लीक झाल्याचे समोर आले होते. त्यांनंतर त्यांनी आपण महाराष्ट्र सरकारच्या परवानगीनेच फोन कॉल्स टॅप केल्याचे सांगत आपली बाजू मांडली होती.