(वैभव पवार / गणपतीपुळे)
संयुक्त राष्ट्र संघाने २०२३हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर केले असून यांतर्गत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्य जागरूकता निर्माण व्हावी आणि विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना शेतीचे ज्ञान व्हावे, नाचणी भात लावणीचे प्रात्यक्षिक समजावे यासाठी रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी भात आणि नाचणी लावणी केली. यासाठी मागील अनेक वर्षे शाळेच्या समोर विनावापर असलेल्या शेतीचा उपयोग करण्यात आला.
शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीने संबंधित जमीन मालक श्रीम. रंजना रघुनाथ बारगुडे यांच्याशी चर्चा करून शाळेच्या विद्यार्थ्यांना लावणी करण्यासाठी जमीन मिळावी अशी विनंती केली. त्यानुसार त्यांनीही लगेच जमीन देण्यास सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर शाळेच्या वतीने पालकांनी आधुनिक शेतकरी राजू वरवटकर आणि विलास बारगुडे यांच्या मदतीने विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत जमीनीची फोड केली. चिखल झाल्यानंतर नाचणी व भात कसे लावायचे याचे प्रात्यक्षिक प्रसिद्ध शेतकरी अप्पा धनावडे, मारुती कुर्टे, संदीप धनावडे यांनी दाखविल्यानंतर विद्यार्थ्यांनी नाचणी व भात या रोपांची लागवड केली.
विद्यार्थ्यांना पौष्टिक तृणधान्याची माहिती होतानाच स्वतः त्यामध्ये लागवड केल्यास भविष्यात ती जाणीव त्यांच्यामध्ये कायम राहील म्हणून हा उपक्रम राबविण्यासाठी शाळेने पुढाकार घेतला. त्यासोबतच धावत्या जीवनशैली मध्ये शेतीकडे आणि पौष्टिक बाबीकडे होणारे दुर्लक्ष दूर करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये याबाबतीत जनजागृती निर्माण होण्यासाठी या उपक्रमाचा फायदा होईल अशी अपेक्षा माजी सरपंच अप्पा धनावडे आणि शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विलास बारगुडे यांनी व्यक्त केली.
या उपक्रमांतर्गत विविध टप्प्यावर विद्यार्थ्यांना पालकांच्या मदतीने मार्गदर्शन केले जाणार आहे. याकामी प्रविणा धनावडे, नीलम धनावडे, निकिता कुर्टे, प्रज्ञा धनावडे, प्रेरणा धनावडे, मनस्वी तांबटकर,संपदा धनावडे, दिव्या कुर्टे, सरिता वरवटकर, वेदिका धनावडे यांनी सहकार्य केले. तर या उपक्रमाच्या सुरुवातीच्या प्रसंगी चेतन धनावडे, रेश्मा कुर्टे, अक्षरा शिर्के यांनी विशेष प्रयत्न केले. तर या उपक्रमाचे नियोजन शालेय व्यवस्थापन समिती आणि पालक यांच्या मदतीने शाळेचे मुख्याध्यापक माधव अंकलगे आणि शिक्षका रेणुका धोपट यांनी केले. विद्यार्थ्यांना परिपूर्ण माहिती मिळावी यासाठी शाळेने राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.