वैभव पवार, गणपतीपुळे
गणपतीपुळे : आज-काल समाजात लहान मुला मुलींचे बारसे करून नाव ठेवण्याची प्रथा सर्वत्रच आहे. परंतु एखाद्या झाडाचं बारसे करून त्याचे नाव ठेवल्याचे ऐकले तर निश्चितच कुणालाही नवल वाटल्याशिवाय राहणार नाही असाच काहीसा आगळावेगळा बारसे उपक्रम रत्नागिरी तालुक्यातील वाटद कवठेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील विद्यार्थ्यांनी राबविला आहे.
येथील शालेय विद्यार्थ्यांनी झाडांची जोपासना करताना त्या झाडाला मोठे करून जगवण्याचा ध्यास घेतला आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना अनुकरणीय असा उपक्रम वाटद कवठेवाडी शाळेप्रमाणेच संपूर्ण जिल्ह्यात राबविणार असल्याचे प्रतिपादन या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण व अर्थ समितीचे सभापती चंद्रकांत मंचेकर यांनी केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी शाळेत पर्यावरण संतुलन आणि वृक्ष संवर्धन व्हावे हा हेतू समोर ठेवून पंचायत समिती रत्नागिरीच्या सभापती संजना माने यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन करून झाडांचे बारसे उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
या उपक्रमाच्या सुरुवातीला महाड दुर्घटनेसह विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत आणि कार्यक्रमाच्या अध्यक्ष संजना माने आणि उपस्थित असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी निशा देवी वाघमोडे यांच्या हस्ते झाडांचे बारसे करताना झाडाला बाळाला पाळण्यात घालण्यात आले. तसेच या उपक्रमाच्या निमित्ताने पाळण्यात घालण्यात आलेल्या झाडांचे नाव रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधकारी निशादेवी वाघमोडे यांच्या नावावरुन ‘ निशादेवी’ असे ठेवण्यात आले.
पर्यावरणाचा वाढता होणारा र्हास टाळण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे त्यासोबतच कवठेवाडी शाळेने वृक्ष संवर्धनासाठी राबवत अनोख्या पद्धतीने साजरा केलेल्या उपक्रमाची सर्वत्रच पुनरावृत्ती होण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न होणे आवश्यक आहे. लहान वयातच जर पर्यावरण संतुलन आणि वृक्षसंवर्धनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिल्यास नैसर्गिक आपत्तीच्या घटना घडणार नाहीत यासाठी झाडांचे संगोपन पटवून देणाऱ्या झाडांचा उपक्रम राबविण्याची गरज असल्याचे मत चंद्रकांत मंचेकर यांनी व्यक्त केले.
त्यानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी निशा देवी वाघमोडे यांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक करत शाळा करत असलेल्या उपक्रमांना पालक व ग्रामस्थांचे सहकार्य लाभल्यास विद्यार्थी विकास होतानाच शाळेचा ही विकास होतो असे मत व्यक्त केले. पर्यावरण पूरक आणि वृक्षसंवर्धनाचे महत्त्व सांगणाऱ्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाबाबत सर्वच मान्यवरांनी समाधान व्यक्त केले. या उपक्रमाचे उद्घाटन प्रसंगी समिती रत्नागिरी पंचायत समिती सभापती संजना माने, उपसभापती उत्तम सावंत, गटविकास अधिकारी तुकाराम जाधव, जिल्हा परिषद सदस्या ऋतुजा जाधव, पंचायत समिती सदस्य गजानन पाटील, केंद्रप्रमुख अनिल पवार, विस्ताराधिकारी सुनील पाटील आदि मान्यवर आदी मान्यवर उपस्थित होते. वाटद कवठेवाडी शाळेच्य या कौतुकास्पद उपक्रमाला शाळेचे शिक्षक माधव अंकलगे व गोविंद डुमनर यांचे विशेष मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.