(रत्नागिरी / प्रतिनिधी)
तालुक्यातील पाली येथील वळके बौद्धवाडीच्या दफनभूमित बीएसएनएल कंपनीचा मोबाईल टॉवर उभारण्यास स्थानिक जनतेचा प्रखर विरोध आहे. या प्रकरणासंदर्भात दफन भूमीची जागा सोडून इतर ठिकाणी टॉवर उभारावा, शासनाने घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशा आशयाची निवेदने ग्रामस्थांकडून रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयांत यापूर्वी देण्यात आली आहे. मात्र स्थानिकांच्या विरोधाबाबत जिल्हाधिकारी यांनी अद्याप कोणतीही भूमिका घेतली नसल्यामुळे मंगळवारी ( दिनांक 8 ऑगस्ट 2023 ) भारतीय बौद्ध महासभेच्या तालुका, जिल्हा कार्यकारणीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन चर्चा करण्याचे ठरविले. दरम्यान जिल्हाधिकारी आपल्या कामानिमित्त बाहेर असल्याने निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्यासोबत पदाधिकाऱ्यांनी चर्चा करून निवेदन सादर केले.
बीएसएनएल कंपनीचे अधिकारी इतर जागेत टॉवर उभारण्यास तयार
बीएसएनएल कंपनीचे अधिकारी व वळके बौध्द समाजातील पदाधिकारी यांच्यामध्ये चर्चा झाली होती. या झालेल्या चर्चेत बीएसएनएलचे अधिकारी स्मशानभूमीची जागा सोडून सदरचा होऊ घातलेला टॉवर अन्य राखीव भूखंडात हलविण्यास तयार आहेत. असे असूनही वळके ग्रामपंचायतचे सरपंच व प्रशासकीय अधिकारी वळके बौध्दवाडीचे स्मशानभूमीतच सदरचा टॉवर उभरण्याचा अटाहास करतात ही बाब अत्यंत खेदजनक आहे, असेही निवेनात म्हटले आहे.
बौद्ध समजाकडून उपोषणाला बसण्याचा इशारा
सदरचा होऊ घातलेला टॉवर वळके बौध्दवाडीच्या १२ गुंठेचे दफन भूमीत न बांधता इतर जे ५० राखीव भूखंड आहेत त्याठिकाणी उभरावा तसे न झाल्यास येत्या १५ ऑगस्ट २०२३ रोजी देशाच्या स्वातंत्र्य दिनी वळके गावातील बौध्द समाजाबरोबर जिल्हयातील सर्व बौध्द समाज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाला बसेल. प्रस्तुत पत्र प्रकरणी देत असलेले निवेदन हे उपोषणाची नोटीस आहे हेही समजण्यात यावे. यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी शासन जबाबदार राहील, असा इशारा निवेदनातून भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने प्रशासनाला देण्यात आला आहे.
तसेच निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना देखील देण्यात आले आहे. यावेळी निवेदन सादर करताना भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाप्रमुख अनंत सावंत, जिल्हा महासचिव एन बी कदम, कोष्याध्यक्ष विजय कांबळे, भा. बौ. म. तालुकाध्यक्ष वी बी मोहिते, तुषार जाधव, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष रूपेंद्र जाधव, तालुका महासचिव मुकुंद सावंत, आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
आता तरी जिल्हाधिकारी भूमिका स्पष्ट करणार का?
ग्रामस्थांनी बीएसएनएल कंपनीच्या जमीन मोजणीसाठी दाखल झालेल्या पथकाला दोनवेळा विरोध दर्शवत परतवून लावले होते. यानंतर स्थानिकांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करण्यास वेळ मागितली होती. याबाबत जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांनी वेळही दिली. मात्र ते स्वतः बैठकीला उपस्थित राहू शकले नाही. तसेच दिशा समितीच्या बैठकीत देखील खासदार विनायक राऊत यांनी हा मुद्दा उपस्थित करून दफन भूमीच्या जागेव्यतिरिक्त इतर ठिकाणी टॉवर उभारावा असे आदेश दिले होते. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेतली नसल्यामुळे बौद्ध समाजाने १५ ऑगस्ट रोजी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. स्थानिकांना वंचीत बहूजन आघाडी पक्षाने जाहीर पाठिंबा दिला आहे. मात्र आतातरी जिल्हाधिकारी आपली भूमिका स्पष्ठ करणार का? हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
या घटनेचा सर्वप्रथम भारतीय बौद्ध महासभेच्या तालुक्याच्या वतीने आम्ही निषेध व्यक्त करतो. स्मशान भूमीची जागा वगळून इतर भूखंडामध्ये टॉवर बीएसएनएल कंपनीचा उभा करावा. या संदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे. त्या जागेवरच हट्ट धरून बसले तर सर्व बौद्ध बांधवांना घेऊन येत्या स्वतंत्र दिनाच्या दिवशी उपोषण करावे लागेल असा इशारा देखील या निवेदनातून आम्ही दिलेला आहे.
– वी बी मोहिते ( तालुकाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा)