【मुबंई / उदय दणदणे】
वर्षावास म्हणजे ऐन पावसाळा ! आषाढ ते अश्विन महिन्यापर्यंत गुरु-शिष्यांच्या सहवासात होणारे विविध सांप्रदायांचे ग्रंथ वाचन !
आजपर्यंत ग्रंथ वाचनाचे असे सर्व कार्यक्रम हे पारायण म्हणून मंदिरे, बुध्दविहारे किंवा त्या त्या परिसरात होतात. प्रबोधनांच्या ह्या कार्यक्रमांना शिक्षित पिढी येत नाही, अशी खंत आयोजक व्यक्त करत असतात, पण तसं नाहीय!आवड असलेला कोणताही आधुनिक प्रयोग पाहण्यासाठी आता विद्यालय – महाविद्यालयातील नवी पिढी येऊ लागलेय म्हणूनच, “संयुक्त माझगाव बौध्द विकास तथा सामाजिक विकास संघटना, मुंबई” ही सामाजिक संघटना व “विचारवंत ओबीसी समुदाय” तसेच स्मित-हरी प्रॉडक्शनच्या सहयोगाने “तथागतांचे निरुपण” हा संगीतमय आधुनिक प्रयोग रविवार दि.२ जुलै २०२३ रोजी सकाळी ११ वा. अण्णाभाऊ साठे नाट्यगृह, राणीबाग भायखळा (मुंबई) येथे सादर होणार आहे.
सदर वर्षावास प्रारंभासाठी, भारतीय बौध्द महासभा व बौध्दजन पंचायत समितीआणि ओबीसी संघटनांचे मान्यवर प्रतिनिधी, गटप्रमुख, शाखाध्यक्ष, सभासद, बौध्दाचार्य, उपासक, उपासिकांच्या परिवारासह, श्रेष्ठ साहित्यिक पत्रकार आयु. गुणाजी काजिर्डेकर. प्राध्यापक डॉ. विष्णू भंडारे, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी (सिध्दार्थ महाविद्यालय), प्राध्यापक डॉ. सुनील रामटेके, मराठी विभाग प्रमुख (दामोदर नाथाबाई ठाकरसी महीला महाविद्यालय चर्चगेट), प्राध्यापक योगेश चिकटगांवकर लोककला अभ्यासक (मुंबई विद्यापीठ), यांच्या प्रमुख उपस्थितीत, हा “वर्षावास प्रारंभ सोहळा” संपन्न करण्याचा निर्धार आहे. कुटुंब समवेत पाहण्याजोगे या कार्यक्रमास रसिक प्रेक्षकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन “स्मित-हरी प्रॉडक्शन” चे निर्माते हरी पाटणकर, कोकणातील “विचारवंत ओबीसी समुदाय” आणि “संयुक्त माझगाव बौद्ध विकास तथा सामाजिक विकास संघटनेचे अध्यक्ष आयु. यशवंत ओव्हाळ यांनी केले आहे.