( सिडनी )
सिडनी येथे बांग्लादेश विरूद्ध बुधवार 2 नोव्हेंबर रोजी झालेल्या सामन्यात टीम इंडियाने बांग्लादेशवर 5 धावांनी विजय मिळवला. सेमीफायनलमध्ये एन्ट्रीसाठी दोन्ही संघाना आजचा सामना महत्त्वाचा होता. मात्र टीम इंडियाने बाजी मारली.
भारतानं प्रथम फलंदाजी करत बांग्लादेशसमोर 184 धावाच लक्ष्य ठेवलं होत. विराट कोहली 44 चेंडूत 64 धावा आणि के. एल. राहुलनं 32 चेंडूत 50 धावांची झुंजार अर्धशतके केली. सूर्यकुमार यादवच्या 16 चेंडूत 30 धावा महत्वाच्या ठरल्या.
बांग्लादेशने फलंदाजीला सुरुवात करताच टीम इंडियावर तुटून पडले. दोन्ही फलंदाजांनी भुवनेश्वर कुमारला झोडपून काढले. 6 षटकात 67 धावा पहिल्या जोडीने फलकावर लावल्या. त्यानंतर मात्र टीम इंडियावर वरुण राजाची कृपा झाली. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना काही काळ थांबवण्यात आला. त्यानंतर DLS मेथड नुसार सामना 17 षटकांचा खेळविण्यात आला. यानंतर मात्र बांगलादेश समोर 54 चेंडूत 84 धावांच आव्हान होत. मात्र फलंदाजीला सुरुवात होताच हाणामारीच्या नादात बांगलादेशने विकेट गमावल्या. शेवटच्या षटकात 6 चेंडू 20 धावांची आवश्यकता होती. यावेळी चेंडू अर्शदीप कडे सोपवण्यात आला. पहिल्या चेंडूवर 1 धाव निघाली. दुसऱ्या चेंडूवर संतो याने 6 धावा काढल्या. तिसरा चेंडू अर्शदिपने निर्धाव टाकला. यावेळी 3 चेंडू 13 धावांची आवश्यकता होती. चौथ्या चेंडूवर 2 धावा निघाल्या. पाचव्या चौकार ठोकण्यात आला. शेवटचा चेंडू आणि 7 धावा अस समीकरण होत. साऱ्यांच्या नजरा चेंडूवर खिळल्या होत्या. 6 धावा निघाल्या तर सामना टाय होणार होता. मात्र शेवटच्या चेंडूवर बांग्लादेशच्या फलंदाजाने एकच धाव काढली. आणि टीम इंडियाने 5 धावांनी सामना जिंकला. टीम इंडियाचं सेमी फायनल तिकीट आता फायनल झालं आहे.