(मुंबई)
मुंबईमधील वरळी येथे एका गगनचुंबी इमारतीच्या ४२ व्या मजल्यावरून स्लॅबमधील मोठे दगड कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे. वरळीतील या इमारतीचे बांधकाम सुरू होते व त्यादरम्यान इमारतीचा स्लॅब कोसळून फुटपाथवर उभे असलेले दोघे ठार झाले आहेत.
मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. फोर सीजन्स रेसिडेन्सी या गगनचुंबी इमारतीच्या ४२ व्या मजल्यावर बांधकाम करताना स्लॅब कोसळल्याने दोन लोकांचा जागीच मृत्यू झाला. इमरान (कोलकाता वय अंदाजे २२ वर्षे) आणि शब्बीर (बिहार, वय अंदाजे २८ वर्षे) अशी मृतांची नावे आहे. दोघे सावी एक्सपोर्ट कंपनीत काम करत होते.
या अपघातात येथील अनेक वाहनेही नुकसानग्रस्त झाली आहेत. अग्निशमन दल, महानगरपालिका अधिकारी व एनएम जोशी मार्ग ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल होऊन त्वरित मदत कार्य करण्यात आले.