(नागपूर)
रेल्वेतील जाळपोळ रोखण्यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने 450 एसी कोचमध्ये आता आग आणि धूर शोधण्याची प्रगत यंत्रणा बसविली आहे. ही प्रणाली धूर शोधून प्रवाशांना अलार्म, लाइट इंडिकेटर आणि ऑडिओ साउंडसह सावध करते. प्रवाशांच्या सोयीसाठी, सुरक्षिततेसाठी आणि सर्वोत्तम प्रवास अनुभवासाठी रेल्वेने ही यंत्रणा कार्यरत केली आहे. ही यंत्रणा पँट्री कारमध्ये बसवण्यात आली आहे. प्रत्येक डब्यात सरासरी 8 ते 11 स्मोक डिटेक्टर बसवण्यात आले आहेत.
ऑडिओ व्हिज्युअल ध्वनी अलार्म
सर्व एसी डब्यांमध्ये आग धुराचा शोध करण्यासाठी ही यंत्रणा सज्ज करण्यात आली असून एसी कोचमध्ये ही यंत्रणा उपयोगी ठरणार आहे. एसी डब्यांमध्ये आग आणि धूर शोध प्रणाली अंतर्गत सुमारे 8-11 स्मोक सेन्सर्स बसवण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने धुराचा शोध लूपमध्ये कंट्रोल मॉड्यूलशी जोडलेला आहे. आग लागल्यास हे कंट्रोल मॉड्यूल ऑडिओ व्हिज्युअल ध्वनी अलार्म, लाइट इंडिकेटर, प्रीलोडेड घोषणेसाठी लावण्यात आले आहे.
सेन्सर कार्यान्वित होणार
प्रवाशांना सतर्क करण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा उपयोगी ठरणारी आहे. रेल्वेच्या पॉवर कार्स आणि गाड्यांच्या पँट्री कारमध्ये आग आणि धूर शोधण्याची प्रगत यंत्रणा बसविल्याने संभाव्य धोका कमी करण्यात मदत झाली आहे. धुर शोधणारी ही यंत्रणा ट्रेनमध्ये आग लागण्यापूर्वीच अलार्म वाजवेल. त्यामुळे आगीवर वेळीच नियंत्रण मिळवता येणार आहे. आगीची ठिणगी किंवा आगीची घटना लक्षात येताच सेन्सर कार्यान्वित होणार आहे. ट्रेनमध्ये आग लागण्याच्या घटना रोखण्यासाठी आता ही यंत्रणा बसविली आहे.