(संगलट-खेड / इक्बाल जमादार)
रासायनिक कंपन्यांची औद्योगिक वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खेडमधील लोटे एमआयडीसीमध्ये रासायनिक सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नाल्यात सोडले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लोटे येथील नैसर्गिक जलस्त्रोत यामुळे दूषित झाले असून परिसरातील विहिरींच्या पाण्याचा रंग देखील आता काळा निळा झाल्याचे उघडकीस आले आहे.
नैसर्गिक जलस्त्रोत दूषित झाल्याने येथील जनतेचे आरोग्य धोक्यात आले असताना, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रड मंडळ तसेच औद्योगिक विकास मंडळ अधिकाऱ्यांकडून मात्र हे प्रकार रोखण्यासाठी कोणतीच ठोस उपाययोजना केली जात नसल्याचे समोर येत आहे. लोटे औद्योगिक वसाहत ही नेहमीच प्रदूषणाच्या मुद्यावरून आजवर चर्चेत राहिली आहे. येथील रासायनिक कंपन्यांकडून शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून घातक रासायनिक सांडपाणी उघड्यावर सोडण्याचे प्रकार अनेक वेळा उघडकीसही आले आहेत. परंतु हे गंभीर प्रकार रोखण्यात प्रशासकीय यंत्रणांना अद्याप यश आलेले नाही.