(खेड / भरत निकम)
लोटे येथील पान टपरी मधून ७७ हजार ८१४ रुपये किंमतीचा गुटखा पकडला गेला होता. या प्रकरणी संशयिताला तब्बल ३३ दिवसांनंतर पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद इब्राहिम पालनगिरी हनीफा (४२, विश्वंबर बिल्डिंग, १ ला मजला,लोटेमाळ, ता. खेड, मुळगाव पालनगिरी हाऊस, कोडलमगुरु, ता. मंजेश्वरा, जि. कासारगोड, केरळ) हा संशयित होता. त्याला न्यायालयाने ६ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून ही कारवाई २ ऑक्टोबर रोजी करण्यात आली होती.
खेड पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली होती. कारवाईत रुपये ७७ हजार ८१४ किंमतीचा गुटखा एका पान टपरीतून पकडला होता. या कारवाईत संशयित पोलिसांना सापडला नव्हता. या प्रकरणात जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे थेट कारवाई करताना पकडलेल्या माल व पोलिस ठाण्यात दाखवलेल्या कारवाईची चित्रफित नागरिकांनी पाठवून दिली होती. याची गंभीर दखल घेत जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी एक अधिकारी आणि दोन पोलिस यांच्यावर कारवाई केली होती. तिघांची बदली हेडक्वार्टर मध्ये केली होती.
या कारवाईमुळे स्थानिक पोलिसांचे धाबे दणाणले होते. त्यामुळे या प्रकरणी संशयिताला ताब्यात घेण्याचे राहून गेले होते. हा संशयास्पद व्यक्ती लोटे येथेच वास्तव्यास होता. मात्र, पोलिस कारवाईस धजावत होते, असे बोलले जात आहे. त्याला अखेर ३ नोव्हेंबर रोजी रात्री सव्वा नऊ वाजता लोटे येथून ताब्यात घेतले. त्याला येथील न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयाने संशयिताला ६ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे स्मिता कदम यांनी काम पाहिले होते.