जर कार खूप दिवसांपर्यंत एकाच जागेवर उभी करून ठेवली तर लॉकडाऊन संपल्यानंतर गाडी सुरू करताना अनेक समस्या येऊ शकतात. यामुळे एकाच जागेवर पार्क करून ठेवलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांची काळजी घेणे अतिशय आवश्यक ठरते.
सध्या देशात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे नागरिक घरी आहेत, मात्र त्याचसोबत कारही घराबाहेर किंवा पार्किंगमध्ये उभ्या करून ठेवल्या आहेत. जर कार खूप दिवसांपर्यंत एकाच जागेवर उभी करून ठेवली तर लॉकडाऊन संपल्यानंतर गाडी सुरू करताना अनेक समस्या येऊ शकतात. यामुळे एकाच जागेवर पार्क करून ठेवलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांची काळजी घेणे अतिशय आवश्यक ठरते. लॉकडाऊननंतर कार पुन्हा सुरू करताना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स…
बॅटरी मेंटेनन्स जर खूप दिवसांपर्यंत गाडी बंद राहिली, तर बॅटरी डिस्चार्ज होऊ शकते. त्यामुळे गाडी सुरू करताना मोठी समस्या येऊ शकते. हे टाळण्यासाठी बॅटरीला चार्ज करणे आवश्यक आहे. प्रत्येक दोन-तीन दिवसांनी कार स्टार्ट करून 15 ते 20 मिनिटांपर्यंत चालू राहुद्या. यामुळे इंजिन गरम होण्यास मदत होईल. यादरम्यान आपण कारचे वायपर, एसी, लाईट सुस्थितीत आहेत का, याचीही तपासणी करू शकता.
हॅण्ड ब्रेक जर आपली कार एकाच जागेवर खूप दिवसांसाठी उभी राहणार आहे, हे आपल्याला माहिती असेल, तर कारला हॅण्ड ब्रेक न लावता ती उभी करा. खूप दिवसांपर्यंत हॅण्ड ब्रेक लाऊन ठेवल्यामुळे कारचे ब्रेक खराब होऊ शकतात किंवा कारचा ब्रेकही लॉक होऊ शकतो. आपण आपल्या गाडीला सपाट पृष्ठभागावर गिअरमध्ये टाकून उभी करू शकता. जर आपली कार उताराच्या ठिकाणी उभी असेल, तर कारच्या चाकांखाली विट किंवा दगड ठेवून द्या. यामुळे गाडी पुढे जाणार नाही. टायर प्रेशर तुम्ही गाडी वापरा किंवा नका वापरू, काही वेळानंतर गाडीच्या टायरमधील हवा आपोआप कमी होऊन जाते. अशामध्ये जर खूप दिवसांसाठी कार एकाच जागेवर उभी राहिली, तर टायरवर एका बाजूला फ्लॅट स्पॉट होण्याची शक्यता वाढते. त्याचा थेट परिणाम टायरच्या ग्रिप, कारच्या राईड क्लॉलिटी आणि मायलेजवर होतो. यामुळे काही ठराविक दिवसांनंतर गाडीला थोडे पुढे मागे करण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे टायर फिरू शकतील. तसेच टायरमध्ये हवेचा योग्य दाब आहे की नाही, याकडेही लक्ष द्यायला विसरू नका. हवा कमी असल्यास पेट्रोल पंपावरून टायरमध्ये हवा भरून घ्यावी.