(मुंबई)
भिवंडीत एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील कोनगावात एका लिव्ह इन रिलेशनमध्ये असणाऱ्या ३६ वर्षीय महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. महिलेचा धारदार शत्राने गळा चिरण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
ही महिला एका तरुणसोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये होती. त्यानेच तिची हत्या केल्याचा संशय पोलिसांना असून अधिक तपासासाठी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनसाठी जे जे रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. प्राप्त माहिती नुसार मधू प्रजापती असं मयत महिलेचे नाव आहे. इमारतीच्या एका बंद खोलीतून दुर्गंधी येत असल्याने इमारतीच्या मालकाने पोलिसांना कळवले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर दुर्गंधी येत असलेल्या घराचा दरवाजा तोडताच स्वयंपाकघरात एका महिलेचा मृतदेह कुजलेला अवस्थेत पोलिसांना सापडला.
मधू प्रजापती ही घटस्फोटीत असून ती तिच्या पार्टनरसोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होती. या दोघांनी अलिकडेच कोनगाव येथे भाड्याने घर घेतलं होतं आणि गेल्या 11 महिन्यांपासून ते कोनगाव येथे राहत होते. दर महिन्याला ते इमारतीत एक-दोन आठवडे राहायला येत होते. दोघेही जवळच एका कारखान्यात काम करत होते.
शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितले की, हत्या झालेल्या महिलेची एक मैत्रिणही काही दिवसांपासून या दोघांसोबत राहात होती. आरोपीने तिच्या मित्राला फोन करून आपण काहीतरी वाईट कृत्य केल्याचे सांगितले होते. पोलिसांनी सदर महिलेचा धारदार शत्राने गळा चिरण्यात आल्याचे सांगितले. परंतू अधिक तपासासाठी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनसाठी जे जे रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असून आरोपीचा शोध घेत आहे.