(चिपळूण)
बिनशेती जमिनीचे दोन समान भागात हिस्से करून विभाजन करण्यासाठी ४५ हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी पिंपळी खुर्द येथील तलाठी अश्विन चंद्रकिशोर नंदगवळी (३३) याला सापळा रचून रंगेहात पकडले होते. त्यानंतर त्याला एक दिवसांची पोलिस कोठडी व नंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. बुधवारी त्याला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
अश्विन नंदगवळी याच्याकडे पिंपळी खुर्द साजाचा अतिरिक्त पदभार होता. तक्रारदार व त्याचे सहहिस्सेदार यांच्या नावे असलेली बिनशेती जमीन दोन समान हिस्से करून प्रांताधिकाऱ्यांकडून बिनशेती विभाजनाचे आदेश प्राप्त करून घेण्यासाठी प्रांत कार्यालयातील कर्मचाऱ्यासाठी ४० हजार रुपये व वेगळ्या सातबाऱ्यासाठी मंडळ अधिकाऱ्यांसाठी ५ हजार असे एकूण ४५ हजार रुपये नंदगवळी याने संबंधिताकडे १ जून रोजी मागितले.
याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांकडे तक्रार आल्यानंतर त्यांनी पडताळणी केली. त्यानुसार २२ जून रोजी सापळा रचून पिंपळी खुर्द येथील तलाठी कार्यालयात नंदगवळी याला ४५ हजाराची लाच स्वीकारताना पंचाच्या समक्ष रंगेहात पकडले होते.
नंदगवळी याला न्यायालयीन कोठडी मंजूर झाल्यानंतर त्याची चिपळूण येथील जिल्हा व अति स न्यायालयात जामीन मिळण्याकरिता अर्ज दाखल केला होता. सदर जामीन अर्जावर बुधवारी खेड जिल्हा न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर जामीन अर्ज मंजूर करण्यात आला. यावेळी अश्विन नंदगवळी यांच्या वतीने खेड जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये ॲड. प्रफुल्ल दामले, ॲड. ऋषिकेश थरवळ यांनी काम पाहिले.