(लांजा)
तालुक्यातील दरडग्रस्त ११ गावांतील सुमारे १८० कुटुंबांना सतर्कतेच्या नोटिसा लांजा महसूल विभागाकडून देण्यात आल्या आहेत. वनगुळे बौद्धवाडी येथे भूस्खलनचा धोका असल्यामुळे येथील कुटुंबे अतिवृष्टीवेळी समाजमंदिरात रात्रीच्यावेळी स्थलांतरित होतात. दरडग्रस्त परिसरात पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
लांजात आतापर्यंत सरासरी १८००.११ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. लांजा तालुक्यात अतिवृष्टीमुळे किरकोळ नुकसान वगळता मोठी हानी नाही. तालुक्यातील दरडग्रस्त गावांचे भूगर्भ शास्त्रज्ञातर्फे सर्वेक्षण करून गावे निश्चित करण्यात आली आहेत. अतिवृष्टीसाठी धोकादायक असलेल्या भागात खोरनिनकोतील साईनगर, मुसळेवाडी येथील २५ घरे, वनगुळे ५ घरे, इंदवटी ९, खावडी भोवडवाडी १५, गोळवशी तेलीवाडी २०, साटवली तालयेवाडी, भांडारवाडी ३४, भांबेड दत्त मंदिर १, वेरवली पाथरेवाडी ११, कुरंग १३, निवसर मुस्लिमवाडी ४०, इंदवटी बाईतवाडी २, गांगरकर कोकण रेल्वे ट्रक बोगदा शेजारी ५, कोल्हेवाडी १ यांचा समावेश आहे.
या लोकांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. इंडवटी बाईतवाडी येथील कुटुंबे दुसऱ्या घरात स्थलांतर केले आहेत. इंदवटी येथे रस्ताकाम करण्यात आले असून खोरनिनको येथे धोकादायक ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. दरडग्रस्त गावात शेळके, बबन जाधव, एकनाथ घाणेकर, लोहार यांनी गावातील यंत्रणा, संस्था मंडळे यांच्या संपर्कात राहून ग्रामस्थांच्या मदतीने आपत्तकालीन परिस्थितीत सहकार्य करायचे आहे. लांजा तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. लांजा आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष तहसीलदार प्रमोद कदम यांनी सर्व यंत्रणेला सतर्कतेच्या सूचना दिल्या आहे.