(लांजा)
लांजा येथील तरुणाने खवले मांजराला जीवदान दिले आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वेरळ येथे असणाऱ्या हॉटेल अनमोलचे मालक अनिरुद्ध कांबळे यांना दि.१६ ऑक्टोबर रोजी रात्री १२.३० वाजण्याचा सुमारास खवले मांजर दिसले. महामार्गावरील वाहनांच्या वर्दळीमुळे खवले मांजर रस्त्यावरुन हालत नसल्याचे कांबळे यांच्या लक्षात आले. त्यांनी ते खवले मांजर आपल्या हॉटेलमध्ये आणून ठेवले व या संदर्भात प्रसिद्ध उद्योजक किरण सामंत यांना कळविले.
यानंतर सामंत यांनी तात्काळ विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) यांना घटनेची माहीती दिली. विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) यांच्या आदेशानुसार लांजा येथील वनपाल व इतर कर्मचारी यांनी घटनास्थळी जावून माहीती घेतली. त्यावेळी वेरळ येथे सापडलेल्या खवले मांजरला कोणत्याही प्रकारे जखम झाली नसल्याची खात्री करून वनपाल यांनी तिला ताब्यात घेतले. दरम्यान, लांजा पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत खवले मांजरची तपासणी करून ते सुस्थितीत असल्याने तिला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
या कार्यवाहीवेळी विभागीय वनअधिकारी दिपक खाडे व सहाय्यक वनसरंक्षक सचिन निलख रत्नागिरी (चिपळूण) यांच्या आदेशानुसार वनपरीक्षेत्र अधिकारी प्रकाश सुतार, रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली लांजा येथील वनपाल दिलीप आरेकर व वनरक्षक विक्रम कुंभार यांनी पार पाडली.
याबाबतीत पुढील तपास सुरु असून वन्यप्राणी मनुष्य वस्तीत आढळ्यास किंवा संकटात सापडल्याचे निदर्शनात आल्यास त्यासंबधी वनविभागाचे १९२६ या हेल्पलाइन क्रमांकाशी संपर्क साधण्याचे आवाहन परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार यांनी केले आहे.