(लांजा / प्रतिनिधी)
ग्रामीण भागातील क्रिकेट खेळाडूंना नवे व्यासपीठ मिळवून देण्याचे काम ग्रामीण क्रिकेट मंडळे करत असून वाडगाव येथील बाळकोजी नवतरुण उत्कर्ष मंडळ कातकरवाडी या मंडळाचे कार्य कौतुकास्पद आहे. मंडळाने विविध क्षेत्रात आदर्शवत काम करत रहावे चांगल्या कामासाठी प्रत्येकवेळी तुमच्या सोबत असेन असे गौरवोद्गार लांजा- राजापूर- साखरपा विधानसभा क्षेत्राचे आमदार राजन साळवी यांनी काढले.
लांजा तालुक्यातील वाडगाव येथील बाळकोजी नवंतरुण उत्कर्ष मंडळाने आयोजित केलेल्या नाईट अंडरआर्म विजय चषक क्रिकेट स्पर्धेच्या उदघाटना प्रसंगी आमदार राजन साळवी बोलत होते. या प्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, जि प माजी शिक्षण व अर्थ सभापती चंद्रकांत मणचेकर, शिवसेना तालुका अध्यक्ष संदीप दळवी, संपर्कप्रमुख शशिकांत सावंत, विभाग प्रमुख शरद चरकरी, सरपंच संघटना अध्यक्ष संजय पाटोळे, वाडगाव-हसोळ ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. अनुष्का कातकर, बेनिखुर्द-खेरवसे ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विजय जाधव, वाडगाव-हसोळ विकास सोसायटीचे अध्यक्ष यशवंतराव, पोलीस पाटील मंगेश पाटोळे, तंटामुक्ती अध्यक्ष दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.
जि. प. चे माजी शिक्षण सभापती चंद्रकांत मणचेकर बोलताना म्हणाले की, बाळकोजी नवतरुण उत्कर्ष मंडळाला धन्यवाद द्यायला हवेत. ग्रामीण भागातील क्रिकेट खेळाडूंना क्रीडा क्षेत्राच दालन उभं करून देत आहेत. आपल्या भागात चांगले काम करत राहा. चांगल्या कामाचेच कौतुक होत असते असे म्हणाले. यावेळी आमदार राजन साळवी यांचा बाळकोजी नवतरुण उत्कर्ष मंडळच्यावतीने गणेशमूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर राजन साळवी यांच्या हस्ते फित कापून व श्रीफळ फोडून स्पर्धेचे उदघाटन पार पडले.