( लांजा / प्रतिनिधी )
लांजा येथे प्रवासी महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी लांबवणाऱ्या अट्टल चोरट्याला जळगाव येथून अटक केली. ही घटना डिसेंबर २०२२ मध्ये लांजा बस स्थानकात घडली होती .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लांजा बस स्थानकात एसटी बसमध्ये चढणाऱ्या एका महिलेच्या हातातील अडीच तोळ्याची सोन्याची बांगडी कुणाल सुनील गायकवाड ( वय ३९ , राहणार अंबरनाथ , ठाणे ) या चोरट्याने लंपास केली होती. याप्रकरणी लांजा पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता .
कुणाल गायकवाड हा अट्टल चोरटा जळगाव येथे असल्याची माहिती लांजा पोलिसांना मिळाली होती. यानुसार लांजा पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजस्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल सचिन भुजबळराव , कॉन्स्टेबल प्रथमेश वारिक , मंगेश कोलापटे यांच्या पथकाने जळगाव येथे जाऊन या सराईत चोट्याला ताब्यात घेतले . या चोरट्याला घेऊन लांजा पोलिसांचे पथक रविवारी लांजा पोलिस ठाण्यात दाखल झाले .