(लांजा)
जिल्ह्यातील इतर तालुक्यांसाठीही आदर्शवत असे पाऊल लांजातील ग्रामस्थानी टाकले आहे. शहरांमध्ये विविध घटनांतून दोन समाजामध्ये तेढ निर्माण होण्याच्या घटना निदर्शनास आल्यानंतर ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन शांतता कमिटी स्थापन केली आहे. याबाबतचे निवेदन उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आले.
लांजा येथे स्थापन करण्यात आलेल्या गावकमिटीमध्ये हिंदू आणि मुस्लिम समाजातील वीसजणांचा समावेश करण्यात आला आहे. ज्या वेळी अशा प्रकारच्या घटना लांजा शहरांमध्ये घडतील त्या त्या वेळी ही कमिटी यामध्ये सक्रिय सहभाग घेईल आणि दोन समाजामध्ये निर्माण होणारा तणाव दूर करण्याचे काम करेल. भविष्यात काही घटनांच्या पार्श्वभूमीवर दोन समाजातील लोकांना समोरासमोर बसवून प्रश्न निकाली काढण्यासाठी ही कमिटी काम करणार आहे. लांजा गावचे प्रमुख सुधाकर शेट्ये आणि प्रकाश लांजेकर यांच्या नेतृत्वाखाली या शांतता कमिटीने उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत केडगे आणि पोलिस निरीक्षक दादासाहेब घुटुगडे यांची भेट घेऊन याबाबतची सर्व वस्तुस्थिती त्यांना सांगून स्थापन केलेल्या कमिटी सदस्यांची नावे सुपूर्द करण्यात आली.
या गावाने स्थापन केलेल्या शांतता कमिटीत सदस्य म्हणून नितीन शेट्ये, दिलीप मुजावर, राहुल शिंदे, नंदराज कुरूप, सुशील कुलकर्णी, मिलिंद लांजेकर, हनीफ नाईक, नागेश कुरूप, श्रीनिवास शेट्ये, प्रवीण शेट्ये, मुन्ना नाईक, शौकत नाईक, शिवाप्पा उकली, बापू लांजेकर, अकबर नाईक, रिझवान मुजावर, मुश्ताक नेवरेकर, अश्रफ रखांगी, हुसैन नेवरेकर, शमीम नाईक असे वीसजण शांतता कमिटीचे सदस्य आहेत.