(लांजा / जगदीश कदम)
लांजातील यश कन्स्ट्रक्शन ठेकेदारी फर्मच्या बँक ऑफ इंडिया मधील खात्यातून ९२ लाख ५० हजार रुपये रक्कम हॅकर्सनी परस्पर हडप केल्याची सायबर चोरी प्रकरण नऊ महिन्यांपूर्वी लांजात घडले. या घटनेमुळे लांजा शहर व जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. परंतु या घटनेला नऊ महिन्यांचा प्रदीर्घ काळ लोटूनही या प्रकरणाचा कोणताही तपास झालेला नाही. यामुळे योग्य तो न्याय मिळण्याची अपेक्षा फोल ठरत असल्याने अखेर शासन दरबारी कैफियत मांडण्यासाठी स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्टला लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय भिंगार्डे कुटुंबीयांनी घेतला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे उपोषण छेडण्यात येणार आहे.
लांजातील बँक ऑफ इंडियाचे स्टार टोकन ॲप हॅक करून लांजातील यश कन्स्ट्रक्शन या ठेकेदारी फर्मच्या खात्यातून तब्बल ९२ लाख ५० हजार रुपयांची रक्कम सायबर चोरट्यांमार्फत ऑनलाइन फसवणूक करुन ४ ऑक्टोबर २०२२ रोजी परस्पर हडप करण्यात आली होती. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर ७ ऑक्टोबर २०२२ रोजी याबाबत पोलिसांकडे फिर्याद दाखल केली गेली. त्यानंतर लांजा पोलीसांच्या तपास यंत्रणेच्या याप्रकरणी झालेल्या ढिलाईपणामुळे हे प्रकरण जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे वर्ग करण्यात आले. मात्र जिल्हा पोलीस दलाकडूनही या मोठ्या सायबर चोरीचा तपास गेले नऊ महिने रखडलेलाच आहे. यामुळे मोठ्या आर्थिक नुकसानीची झळ या फर्मच्या मालकांना बसली असून बँक ऑफ इंडियाकडूनही वाऱ्यावर सोडले गेले आहे.
याबाबत पत्रकार परिषदेत बोलताना या फर्मचे संस्थापक संचालक सुधीर भिंगार्डे, चंद्रशेखर भिंगार्डे, संदीप भिंगार्डे म्हणाले की, या प्रकरणाचे पुढे काय झाले, कशा पद्धतीने कारवाई सुरु आहे, तपास कुठपर्यंत आहे अशी कोणतीही खात्रीलायक माहीती आम्हाला तपास यंत्रणेकडून उपलब्ध होत नाही. पोलिसांकडून केवळ तपास करीत असल्याचे सांगण्यात येत असल्याने आम्ही तक्रारदार हवालदिल झालो आहोत. इतक्या मोठ्या रकमेची चोरी होऊन देखील या गंभीर घटनेतील तपास प्रलंबित राहिल्याने यश कन्स्ट्रक्शन फर्मचे मोठे नुकसान झाले असून कर्जबाजारी झालो आहोत. व्यवसाय देखील अडचणीत आलेला आहे.
कोणताही तपास आणि पाठपुरावा गांभिर्याने झाला नसल्याने याप्रकरणी अटक झालेला आरोपीही जामीनावर सुटला. लांजा पोलिसांनी कलकत्ता (पश्चिम बंगाल) येथून पकडलेल्या या आरोपीकडून तपासात इतर अन्य ५ राज्यातील संशयीतांची आडनावे समजली होती. परंतु हाती लागलेल्या नावांचा कोणताही पाठपुरावा लांजा पोलिसांच्यावतीने योग्य रीतीने झालेला नाही. एवढी मोठी आर्थिक अफरातफर होऊन सुद्धा सदर प्रकरणाचा अधिक तपासासाठी दुसऱ्या राज्यात पोलीस पथक पाठवण्यात आलेले नाही. पोलीस तपास यंत्रणेच्या या गाफीलपणामुळे आरोपी सुटल्यानंतरही कोणत्याही पद्धतीची ठोस हालचाल लांजा पोलीसांनी केलेली नाही.
ते पुढे म्हणाले की, पैसे चोरीला गेल्याने आमचे कुटुंब मोठ्या आर्थिक नुकसानीत आले आहे. मात्र संबंधित बँक आणि तपास यंत्रणेला याचे कोणतेही सोयरसुतक नसल्याने स्पष्ट होत आहे. मुख्यत्वे या प्रकरणात बँक ऑफ इंडिया देखील ही सर्व जबाबदारी नाकारत आहे. बँकेने ग्राहक म्हणून आमच्या नुकसानीला गांभीर्याने हाताळणे गरजेचे होते. बँकेने याप्रकरणी आम्हाला आजवर कोणतेही सहकार्य केलेले नाही. आम्ही व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज आकारणी तूर्तास बंद करावी अशी विनवणी करून देखील बँकेकडून कसलाही दिलासा दिला जात नाही. तरी या सर्व प्रकरणाचा तपास जलद गतीने होण्यासाठी आणि पोलीस यंत्रणेने या प्रकरणाच्या मुळाशी जावे या हेतूने अखेर सनदशीर मार्गाने उपोषण करण्याचा निर्धार केला असल्याचे भिंगार्डे कुटूंबियांनी यावेळी सांगितले.