(मुंबई)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजव्यापी दौऱ्याला ठाण्यातून सुरूवात झाली आहे. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. सत्तेची डोक्यात हवा गेली की लोकंही लक्षात ठेवतात. त्यामुळे सत्तेसाठी आपला जन्म झाला नाही. जेव्हा जेव्हा अन्याय होतो, तेव्हा तेव्हा एकनाथ शिंदे जन्म घेतो, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. अन्यायाविरोधात लढा, पेटून उठा, अशी शिकवण आपल्याला बाळासाहेब ठाकरेंनीच दिली. मुख्यमंत्री होईन असं माझ्या मनातही नव्हतं. त्या काळात परिस्थितीही तशी होती. आपल्या डोळ्यांदेखत सैनिकांचं खच्चीकरण होत होतं. अनेक गुन्हे आणि तडीपार लादले जात होते. मोक्कासारख्या कारवाया तरूणांवर होत होत्या. मग ती सत्ता काय कामाची? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला. माणूस जन्माने नाही तर कर्माने मोठा होतो.
सत्तेमध्ये आणि मंत्रीपदी असलेली सर्वलोकं पायउतार झाले. पुढे काय होणार ते सुद्धा माहिती नव्हतं. परंतु आम्ही लढण्याचा निर्णय घेतला. लढून एकतर जिंकू किंवा शहीद होऊ, पण आम्ही जो निर्णय घेतला तो सर्वसामान्य माणसांच्या हितासाठी घेतला. या राज्यातल्या जनतेसाठी आपण घेतला. स्वत:च्या स्वार्थासाठी घेतला नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. देवेंद्र फडणवीसांना तुम्ही कलंक म्हणता. पण या देवेंद्रजींनी मनाचा मोठेपणा दाखवून मला सांगितले की, एकनाथजी तुम्ही मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. त्यांनी अजित पवारांना उपमुख्यमंत्री म्हणून स्वीकारलं. याला मनाचा मोठेपणा लागतो. महाकलंक तर तुम्ही आहात, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
शिवसैनिकांच्या केसालाही धक्का लागणार नाही, याची काळजी मी घेईन. सत्ता येते आणि जाते. कारण सत्तेसाठी आपला जन्म झालेला नाही. पण सत्ता असताना असं काम करा की, सत्तेतून बाहेर गेल्यानंतरही लोकं तुमच्यासाठी रस्त्यावर थांबली पाहिजेत. सत्तेचा अमरपट्टी कुणीही घेऊन आलेला नाही. जेव्हा आपल्याकडे काही अधिकार असतात, तेव्हा त्याचा वापर सर्वसामान्य लोकांच्या जीवनासाठी करा. त्याच्या आयुष्यात चांगले दिवस आणण्यासाठी करा, असं एकनाथ शिंदे म्हणाले.