(संगलट / इक्बाल जमादार)
नुकतीच लग्न सराई सुरू झाली असून काळानुरुप राहणीमान व परिस्थितीनुसार अनेक प्रथा, परंपरा मागे पडू लागल्या आहेत. लग्न समारंभाच्या निमंत्रण पत्रिका आता सोशल मीडियावरून पाठवण्याचा ट्रेंड प्रचलित झाला आहे. भरपूर लग्न पत्रिका छापून पाहुण्यांपर्यंत पोहोचवण्यासाठीचा अट्टाहास कमी झाला असून कार्यमालकांचा खर्च, वेळ आणि त्रासही कमी झाला आहे.
धुमधडाक्यात होणाऱ्या लग्न समारंभाचा महत्त्वाचा एक भाग म्हणजे लग्नाच्या निमंत्रण पत्रिका छापणे आणि वाटणे. त्यासाठी कार्यमालकाला खूप धावपळ करावी लागे. काही वर्षांपूर्वी लग्नपत्रिका घेऊन मुलामुलींचे वडील नातेवाईकांना आपल्या स्नेहीजनांना निमंत्रण देण्यासाठी प्रत्येकाच्या घरी जात होते. आस्थेने आपुलकीने, निमंत्रण पत्रिका देऊन लग्राला यायचं बरं का? म्हणून सांगत होते. या निमंत्रण पत्रिका वाटताना होणाऱ्या प्रवासात अनेकदा अपघातासारख्या घटनांचे गालबोट लागत असे. आजही ही पद्धत काही अंशी सुरू असली तरी गतिमान झालेल्या अत्याधुनिक पद्धतीत ती मागे पडत चालली आहे.
जग जवळ आले, पण…
सध्या फेसबुक, द्विटर, मॅसेंजर, या आलेल्या अनेक अॅप्लिकेशनमुळे त्वरित संपर्क होत आहे. जग जवळ आले तरी परंपरेच्या निमित्ताने का होईना एकत्र येणारी मने मात्र दुरावली आहेत. वास्तवापेक्षा आभासी दुनियेत ती जास्त रमू लागली आहेत. त्यामुळे संस्कार आणि परंपरांमधील बाज हरवत आहे. जगात त्याचे माध्यम नक्कीच बदलले आहे. कोरोना काळात प्रवास आणि संचार बंदी होती, त्यावेळीच सोशल मीडियाचा वापर वाढला होता. आता कोरोना जावून बराच कालावधी लोटला असला तरी या सवयी कायम राहिल्या आहेत. लग्नासह बारशाचे निमंत्रणही आता व्हॉटस्अॅपवर दिले जाऊ लागले आहे. त्यातच सोशल मीडियाचा वापर करून सर्व प्रकारची निमंत्रण, संदेश देण्याचे काम अगदी चुटकीसरशी होत आहे. भरपूर लग्न पत्रिका छापून त्या पै-पाहुण्यांपर्यंत पोहोचवण्यासाठीचा अट्टहास आता चांगलाच कमी झाला आहे. व्हॉट्सअॅपसारख्या सोशल माध्यमांचा वापर करून घरातील लग्नाची निमंत्रणे आपल्या सहकारी मित्रांना, नातेवाईकांना घरबसल्या पाठवून आपल्या सवडीप्रमाणे पाहुण्यांना फोन करून आमंत्रण देण्याची प्रथा वाढल्याने आता दिवसाचे काम काही मिनिटांमध्ये होऊ लागले आहे.