( रत्नागिरी / प्रतिनिधी )
जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रित ठेवण्याबरोबरच किनारा सुरक्षा अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. यापुर्वी कोकण किनारपट्टीचा वापर दहशतवादी कारवाईसाठी झाल्याचे उघड झाल्यामुळे किनारी भागातील लँडिंग पॉईंटवर लक्ष केंद्रीत केले जाईल. मच्छिमारांसह किनारी भागातील नागरिकांना सतर्क करण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
रत्नागिरी जिल्ह्याला विस्तीर्ण किनारा लाभला आहे. त्यामुळे किनारी भाग सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे. किनारी भागात मच्छिमारांची वस्ती अधिक आहे. मच्छिमार थेट समुद्रात वावरत असतात. त्यांना समुद्रासह किनारी भागातील हालचाली अधिक माहिती असतात. त्यामुळे त्यांच्या मदतीने किनारी सुरक्षा भक्कम करण्यावर भर दिला जाणार असल्याचे श्री. कुलकर्णी यांनी सांगितले.
बाणकोट ते राजापूर या किनारी भागात असलेल्या सागरी पोलीस स्थानकांना प्राधान्याने आपण भेटी देणार आहोत. याची सुरुवात जयगड, पुर्णगड, शहर पोलीस स्थानक येथून करण्यात आली आहे. समुद्रामार्गेही किनारपट्टीची आपण पहाणी केली आहे. सध्या आठ नौका पोलीस दलाच्या ताफ्यात आहेत. नौकांच्या माध्यमातून गस्त सुरु असते. त्यामुळे किनारी भागातील लँडिंग पॉईटवरील हलचलींवर लक्ष केंद्रीत केले जात असल्याचे श्री. कुलकर्णी यांनी सांगितले. सागरी सुरक्षा दलाना सतर्क करुन त्यांना पोलीस दलाशी जास्तीत जास्त कसे कनेक्ट ठेवता येईल यावर विशेष भर दिला जाणार आहे. नेपाळमधून येणाऱ्या खलाशांची परिपूर्ण माहिती पोलीस स्थानकांद्वारे संकलित केली जात आहे. त्यामध्ये अधिक सुस्पष्टता आणली जाणार आहे. किनारी भागात काम करणाऱ्या परराज्य, देशातील व्यक्तीची नोंद पोलीस दलाकडे असलीच पाहिजे अशा सुचना देण्यात आल्याचे श्री. कुलकर्णी यांनी सांगितले.