(नवी दिल्ली)
भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक गमावली मात्र फलंदाजीत त्याने दमदार कामगिरी केली. रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांनी दमदार सुरुवात केली. रोहित शर्माने खणखणीत षटकार मारत अर्थशतक झळकावले. रोहित शर्माने भारताच्या डावाचा पाया रचला. रोहित शर्मा याने आपल्या या खेळीत आतापर्यंत अनेक विक्रमाला गवसणी घातली आहे.
कर्णधार असताना रोहित शर्माने १५० षटकारांचा पल्ला पार केला. रोहित शर्माने माजी कर्णधार एम. एस. धोनीचा विक्रम मोडला. रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा पाचवा भारतीय खेळाडू झाला. जागतिक कसोटी क्रिकेट स्पर्धेत रोहित शर्माच्या दोन हजार धावा पूर्ण झाल्या आहेत. असा पराक्रम करणारा रोहित शर्मा पहिला भारतीय खेळाडू आहे. दुस-या क्रमांकावर विराट कोहली आहे. विराट कोहलीने ३३ कसोटी सामन्यातील ५५ डावात १९४२ धावा चोपल्या आहेत. रोहित शर्माने कसोटीमध्ये सलामीवीर म्हणून सर्वात वेगवान दोन हजार धावांचा पल्ला पार केला आहे. याआधी हा विक्रम विरेंद्र सेहवागच्या नावावर होता.
गुरुवारी (20 जुलै) वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात त्रिनिदाद येथे दुसरा सामना पोर्ट ऑफ स्पेन येथे सुरू झाला. या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय कर्णधार रोहित शर्मा व यशस्वी जयस्वाल यांनी शतकी सलामी दिली. पोर्ट ऑफ स्पेन कसोटीत रोहितने सलामीला येत आक्रमक फलंदाजी केली. त्याने यशस्वीला सोबत घेत केवळ 20 षटकांत 100 धावांची भागीदारी केली. त्याचवेळी रोहितने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पंधरावे अर्धशतक पूर्ण केले. चहापानानंतर देखील रोहित चांगली फटकेबाजी करत होता. मात्र, 80 धावांवर वारिकन याने त्याला बाद केले. असे असले तरी रोहितची वेस्ट इंडीजविरुद्धची दमदार कामगिरी कायम राहिली.
वेस्ट इंडीजविरूद्ध रोहितचा हा केवळ सहावा कसोटी डाव होता. विशेष म्हणजे या सहा पैकी तीन डावांमध्ये तो शतकाची वेस ओलांडण्यात यशस्वी ठरला आहे. 2013 मध्ये याच संघाविरुद्ध कोलकाता येथे पदार्पण करताना त्याने पहिल्या सामन्यात 177 तर मुंबई येथे दुसऱ्या सामन्यात 111 धावांची नाबाद खेळी केली होती. त्यानंतरच्या दोन डावांमध्ये अनुक्रमे नऊ व 41 धावा त्याने केल्या. त्यानंतर आता अर्धशतक ठोकत त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध आपली आकडेवारी आणखी शानदार केली.