विविध राज्यांमध्ये टाळेबंदी आणि कठोर निर्बंध यासारखे उपाय हाती घेण्यात आले आहेत. यामुळे अनेकांचा रोजगार हिरावला गेला. अशा सर्वच प्रभावित लोकांना आणि देशभरातील गोरगरिबांना सध्या ते असतील तिथेच सवलतीच्या किमतीत अन्नधान्य उपलब्ध व्हावे, यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी रेशनची दुकाने एक दिवसही बंद राहणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी, अशा सूचना केंद्र सरकारने आज रविवारी केल्या आहेत.
टाळेबंदी आणि कठोर निर्बंधांमुळे अनेक राज्यांनी रेशनच्या दुकानांच्या वेळा कमी केल्या आहेत. काही भागांमध्ये दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत, अशा प्रकारच्या तक्रारी आल्यानंतर केंद्रीय अन्न मंत्रालयाने राज्यांना पत्र पाठवून उपरोक्त सूचना केल्या आहेत. देशभरातील गोरगरिबांना सवलतीच्या दरात आणि दारिद्र्य रेषेखालील लोकांना मोफत अन्नधान्याचा पुरवठा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे त्यांची अडचण होणार नाही, याची काळजी घ्यायलाच हवी, असे यात स्पष्ट करण्यात आले आहे.