(रत्नागिरी)
रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी बेरोजगारांची नोंदणी आवश्यक असल्याने आता रोजगारी ॲपच्या माध्यमातून चक्क रेशन दुकानात बेरोजगराची नोंदणी करण्यात येणार आहे. बेरोजगारांना रोजगार देणाऱ्या, त्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणाऱ्या शेकडो योजना केंद्र व राज्य शासनाच्या असताना आणि दुसरीकडे कुशल मनुष्यबळाची गरज असून, ते उपलब्ध होत नसल्याची ओरड आहे.
या दोघांची सांगड घातली जात नसल्याने बेरोजगारीचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालला आहे. विशेषतः असंघटित क्षेत्रात ही समस्या अधिक गंभीर आहे. त्यावर उपाय म्हणून ‘रोजगारी’ हा ॲप विकसित केला आहे.
बेरोजगारांच्या कौशल्याची वर्गवारीची नोंद करून गरजूंना मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी या अॅपची सक्रियता रेशन दुकानातून करण्यात येणार आहे. त्यामुळे गावोगावी रेशनच्या दुकानात या ‘ॲप’च्या माध्यमातून बेरोजगारांची नोंद करता येणार आहे.