(लांजा / प्रतिनिधी)
लांजा प्रशासन आणि रेशन दुकानांच्या अजब फतव्याने येथील ग्राहकांनी संताप व्यक्त केला. ‘धान्य दुकानात आलेले रेशन एका दिवसात घेऊन जा, नाहीतर उद्या मिळणार नाही’ असे सांगण्यात आल्याने ग्राहक आक्रमक झाले होते. या गोंधळानंतर मात्र पोलिसाना पाचारण करण्यात आल्याने पोलिस बंदोबस्तात ग्राहकांना धान्य देण्याची वेळ रेशन दुकानदरावर आली.
लांजा शहरातील रेशन धान्य दुकान नंबर 3 वर रोहिदासवाडी डाफलेवाडी, पानगलेवाडी, तीन कुंभार वाड्या तसेच देवराई, आगरवाडी या वाड्यांबरोबरच विवली, केळंबे आणि धुंदरे येथील सुमारे 755 रेशन कार्डधारक आहेत. गेला महिनाभर रेशन धान्य नसल्याने दुकानावर खडखडाट होता, मात्र रेशन आल्यानंतर गुरुवारी 30 जून रोजी ग्राहकांनी रेशन घेण्यासाठी तोबा गर्दी केली मात्र या ठिकाणी आलेल्या ग्राहकांना रेशन दुकानदारांनी ‘आजच्या आज तुम्ही तुमचे रेशन घेऊन जा उद्या तुम्हाला मिळणार नाही’ असा फतवा काढल्याने ग्राहक संतप्त झाले. लोकांमध्ये गोंधळ निर्माण झाला.750 ग्राहकांना एका दिवसात रेशन देणार तरी कसे असा प्रश्न उपस्थित झाला. त्यानंतर गोंधळाची स्थिती हाताळणे कठीण झाले. त्यामुळे सरते शेवटी दुकानदारांनी पोलिसांना माहिती दिली पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पोलिस बंदोबस्तात रेशनचे वाटप करण्यात आले.
मात्र एका दिवसात एवढ्या एवढ्या ग्राहकांना रेशन देणार तरी कसे असा प्रश्न उपस्थित झाल्याने शेवटी संतप्त झालेल्या ग्राहकांनी पुरवठा शाखेतील अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि आपली व्यथा त्यांच्यासमोर मांडली त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने रेशन देण्यासाठी एक दिवसाची मुदत वाढवून देण्यात आली आहे.