(पुणे)
राज्य शासनाने रेशनकार्ड काढण्यासाठी तसेच नावात बदल करणे, नविन नाव समाविष्ट करणे आदींसाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ऑनलाइन सुविधेमुळे रेशनकार्डसाठी ऑनलाइन अर्ज करता येतो. तसेच रेशनकार्ड डाऊनलोड करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेमुळे रेशनकार्ड काढण्यासाठी नागरिकांना कार्यालयात हेलपाटे मारावे लागत नाही.
शिधापत्रिकेसाठी ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर प्रचलित कार्यपद्धतीनुसार तपासणी करुन योजनेच्या प्रकारानुसार ऑनलाइन ई-शिधापत्रिका उपलब्ध करुन देण्यात येते. अर्जदारास अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या संकेतस्थळावरुन ई रेशनकार्ड डाऊनलोड करता येत आहे. मे 2023 पासून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या सुविधेचा 100 टक्के वापर करावा. फक्त ऑनलाइन पद्धतीने रेशनकार्ड मिळण्याबबतचे अर्ज स्विकारण्यात यावेत. तसेच यापुढे जास्तीत जास्त लोकांना ऑनलाइन अर्ज करण्याची सक्ती करावी जेणेकरुन सर्व सामान्य नागरिकांची आर्थिक लूट थांबेल, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. महा ई सेवा केंद्र, आपले सरकार व सेतू केंद्र या ठिकाणांहून ई रेशनकार्डसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.