(रत्नागिरी / विशेष प्रतिनिधी)
रेल्वे स्थानकाच्या परिसरात रिक्षाचालकांची दादागिरी सुरूच आहे. रेल्वे स्थानकाच्या रोडवर एका रिक्षाचालकाला पाच ते सहा रिक्षा चालकांच्या झुंडीने मारहाण केल्याची घटना बुधवारी (दिनांक 11 ऑक्टोबर 2023 ) घडली. मारहाण केलेल्या रिक्षा चालकाला गंभीर दुखापत झाली असून त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रणव प्रदीप साळुंखे ( वय २४, राहणार रेल्वे स्टेशन, रत्नागिरी ) असे मारहाणीत जखमी झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे.
रेल्वेस्टेशन येथे दादागिरी करणाऱ्या संस्थानिक रिक्षा चालकांच्या त्रासाला प्रवासी, नागरिक हैराण झाले आहेत. रिक्षाचालक प्रणव साळुंखे यांनी आपली रिक्षा हॉटेल गिरीराज येथे शेअरिंग भाड्यासाठी पार्क केली होती. स्थानक परिसरात दादागिरी करणारे पाच ते सहा रिक्षा चालक तिथे येऊन ‘तुला इथे रिक्षा नको थांबवू बोललो, तरी सांगून समजत नाही का’ असे बोलत रिक्षाचालक साळुंखे यांना जबर मारहाण केली. ही मारहाण राजेश पाडावे, सचिन खेत्री, रुपेश चव्हाण, बापल वाडकर, हरीशभैया या रिक्षाचालकांनी मिळून मारहाण केल्याचे जखमी रिक्षाचालक साळुंखे यांनी सांगितले. जखमी साळुंखे हे पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास गेले. तिथून त्यांना पोलिसांनी तातडीने उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात जाण्यास सांगितले. तसेच ते रुग्णालयात दाखल झाले. ही घटना बुधवारी (दिनांक ११ ऑक्टोबर २०३३) दुपारी एकच्या सुमारास घडली. मारहाण करणाऱ्या संशयित पाच जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती.
काही महिन्यांपूर्वी रिक्षा चालकांच्या दादागिरी संदर्भात जिल्ह्यातील वृत्तपत्र, डिजिटल माध्यमांतून बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. यानंतर रत्नागिरी आरटीओचे अधिकाऱ्यांना खडबडून जाग आली. त्यावेळी रेल्वे स्थानकाच्या रोडवर २४ तास विशेष तपासणी मोहीम आरटीओ कार्यालयाकडून राबविण्यात आली होती. मात्र त्यावेळी आरटीओ अधिकाऱ्यांनी मोहीम हाती घेऊन केवळ दिखावूपणाच केला की काय ? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
दादागिरी करणाऱ्या संस्थानिक रिक्षा चालकांचा पुन्हा प्रवाशांना लुटीचा धंदा सुरु झाला आहे. रेल्वे स्थानकातील दादागिरी करणारे रिक्षाचालक आपल्याच मित्रांना शेअरिंग भाड्यासाठी रिक्षा उभी करून देतात. अन्य कोणीही रिक्षा उभी केली की दमदाटी करून तिथून जाण्यास भाग पाडतात. या मारहाणी दरम्यान रोडवरून जाणाऱ्या प्रवाशांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना देखील या रिक्षा चालकांच्या झुंडीने शिवीगाळ केल्याचे जखमी साळुंखे यांनी सांगितले. या दादा, भाईंवर रत्नागिरी पोलीस प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलून कारवाई करावी. स्थानकातील रिक्षाचालक प्रवाशांशी भाड्याबाबत योग्य तडजोड करण्याचा प्रयत्न करतात ती झाली नाही तर उध्दटपणे वागतात. लागलीच शिवीगाळ देखील करतात. प्रवासातून थकलेले प्रवासी या मुजोर रिक्षचालकांशी वाद न घालता आपल्या घरी जाण्यासाठी पर्याय शोधत असतात. मात्र या रिक्षाचालकांवर ठोस कारवाई होत नसल्याने रिक्षाचालकांचा मुजोरपणा अधिक वाढत चालला आहे. रेल्वे स्थानकातील रिक्षा चालकांची मुजोरगिरी कोणाच्या जीवावर चालू आहे? यांच्यावर पोलीस कारवाई का करत नाही? असे संतप्त सवाल या निमित्ताने रेल्वे स्थानकात उतरलेल्या प्रवाशांनी उपस्थित केले आहे.
२४ तास आरटीओ पोलिसांचा बंदोबस्त गरजेचा
आरटीओ पोलिसांनी केवळ दोन, चार दिवस परिसरात पहारा ठेऊन प्रामाणिक रिक्षाचालकांवर कारवाई न करता रेल्वे स्थानकात दबा धरून बसलेल्या रिक्षा चालकांवर वचक निर्माण करावा. अशी सामान्य जनतेची अपेक्षा असते. मात्र तसे होताना दिसत नाही. आरटीओ अधिकारी केवळ सणासुदीच्या दिवसांतून रेल्वे स्थानकाच्या रोडवर उभे राहून चमकोगिरी करतात व गोरगरीब रिक्षाचालकांवर कारवाई करून दामदुप्पट भाडे आकारून प्रवाशांची लूट करणारे स्थानकातील रिक्षाचालक या कारवाईच्या प्रक्रियेत सापडत नसल्याचे चित्र आहे. एकूणच प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या रिक्षा चालकांवर ठोस कारवाई करण्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होताना दिसून येत असल्याची भावना सामान्य जनतेतून निर्माण झाली आहे. यामुळे रेल्वे स्थानकाच्या रोडवर २४ तास आरटीओ पोलिसांनी बंदोबस्त तैनात ठेवणे गरजेचे आहे.
कठोर कारवाईचा बडगा उगरणार का?
स्थानकावर संस्थानिक बनलेल्या काही ठराविक रिक्षा चालकांकडून भरमसाठ प्रवासी भाडे आकारून प्रवासी जनतेची प्रचंड प्रमाणात राजरोस आर्थिक लुट सुरू असल्याचा प्रकारही सुरू आहे. रत्नागिरीत येणाऱ्या प्रवासी जनतेला भाड्याचे दरपत्रक माहीत नसते. त्यामुळे हे रिक्षाचालक प्रवाशांबरोबर दादागिरी करून अडवणूक करून वेठीस धरतात. मात्र प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिसांचे त्याकडे कायम दुर्लक्ष होत असल्याने प्रवासी जनतेमधून प्रचंड संताप आणि नाराजी व्यक्त केली जात आहे. या मारहाणीच्या घटनेवरून तरी आरटीओ अधिकाऱ्यांनी डोळ्यावर बांधलेली पट्टी काढून रेल्वे प्रवाशांना त्रास देणाऱ्या रिक्षाचालकांवर कठोर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार का? हा सवाल उपस्थित होत आहे.