(पुणे)
विरार येथील बिल्डर सुरेश दुबे यांची दि. 9 ऑक्टोबर 1989 रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास नालासोपारा रेल्वे स्टेशनवर 6 ते 7 जणांनी गोळ्या घालून हत्या केली होती. याप्रकरणी सन 1992 साली टाडा लावण्यात आला होता तर 17 आरोपींना अटक करण्यात आली होती. दरम्यान, टाडा कोर्टाचा चार्ज पुण्यातील न्यायालयाकडे असल्याने भारतातील या शेवटच्या टाडा खटल्याचा निकाल विशेष न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी दिला आहे. याप्रकरणी जयंत उर्फ भाई विष्णू ठाकूर, दीपक ठाकूर आणि गजानन पाटील यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
यापुर्वी या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने 6 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्यामध्ये नरेंद्र भालचंद्र भोईर, ज्ञानेश्वर पाटील, उल्हास राणे, पॅट्रीक तुस्कानो, राजा जाधव आणि माणिक अनंत पाटील यांचा समावेश आहे. बिल्डर सुरेश दुबे खून प्रकरणी 2004 मध्ये टाडाचे विविध कलमान्वये व आर्मस अॅक्ट कायद्यानुसार आरोप निश्चत करण्यात आले होते. दरम्यान, आता न्यायालयाने भाई ठाकूर, दीपक ठाकूर आणि गजानन पाटील यांची निर्दोष मुक्तता केली आहे.
या प्रकरणात विशेष सरकारी वकिल सतीश मिश्रा यांनी काम पाहिले, तर बचाव पक्षातर्फे अॅड. सुदीप पासबोला, अॅड. सुधीर शहा, अॅड. रोहन नहार, अॅड. प्रीतेश खराडे, अॅड. सचिन पाटील, अॅड. रोहित तुळपुळे यांनी काम पाहिले आहे.