( रत्नागिरी )
मत्स्यगंधा एक्सप्रेसने गोवा ते मुंबई प्रवास करणाऱ्या एका वृद्ध महिलेचा पर्समधील 4 लाख 34 हजाराच्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना 19 जानेवारी रोजी घडली. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, सुधा सुभाष सावंत (57, मालपा डोंगरी, अंधेरी, मुंबई) या मत्स्यगंधा एक्सप्रेसने मुंबईकडे प्रवास करत होत्या. प्रवासात त्यांना झोप लागल्याने सीटवर बाजूला ठेवलेल्या पर्समधून दागिने चोरीला गेले आहेत. यामध्ये 2 लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, 1 लाख 80 हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या 2 बांगड्या, 55 हजार रूपये किमतीची एक सोन्याची चेन असा एकूण 4 लाख 35 हजार रुपये किमतीचा माल अज्ञाताने चोरून नेला.
याबाबतची फिर्याद त्यांनी 20 जानेवारी रोजी चिपळूण पोलीस स्थानकात दिली. त्यानुसार अज्ञाताविरोधात भादवी कलम 379 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक माने करत आहेत.