चेन्नई शहरातील सेंट थॉमस माउंट रेल्वे स्थानकावर गुरुवारी दुपारी एस. सथ्या या २० वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचा धावत्या रेल्वेखाली ढकलून खून करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. यात तरुणीचा जागीच मृत्यू झाला.
ही तरुणी उपनगरीय रेल्वेतून (लोकल) तांबरमहून एग्मोरला जात होती. ही घटना घडण्याच्या अगदी काही सेकंदापूर्वी तिचा सतीश (२३) नावाच्या तरुणासोबत प्लॅटफॉर्मवर वाद झाला होता. विशेष म्हणजे हा सगळा प्रकार घडत असताना आजूबाजूला लोक होते. शिवाय हा प्रकार सिसिटिव्हितही कैद झाला आहे. आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून रेल्वे पोलिस पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीना पकडण्यासाठी दोन विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजीव गांधी शासकीय सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.