( मुंबई )
राज्यात आपत्कालीन मोफत वैद्यकीय आरोग्य सेवा १०८ ही २०१४ पासून सुरू करण्यात आली. ही रुग्णवाहिका चालवणारे चालक सुरुवातीपासून अत्यंत कमी पगारात काम करत आहेत. यासंदर्भात महाराष्ट्र रुग्णवाहिका क्रमांक १०८ वाहनचालक संघटनेने आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. मात्र, याबाबत तोडगा न निघाल्याने चालक संपावर जाणार आहेत.
बीव्हीजी कंपनीकडून वाहन चालकांनी अत्यंत कमी पगार देत शोषण सुरू असल्याचा आरोप चालकांनी केला होता. याबाबतचे निवेदन वाहनचालकांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना दिले. याबाबत काय तोडगा काढण्यात येईल, यावर चर्चा करण्यात आली होती. त्यानंतर आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी २५ जुलै रोजी बीव्हीजी कंपनीचे संबंधित प्रकल्पाचे संचालक, प्रशासकीय अधिकारी आणि वाहनचालक यांच्यासोबत बैठक आयोजित केली होती. या बैठकीत बीव्हीजी कंपनीने वाहन चालकांसोबत बैठक घेत योग्य विचार करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र आता महिना होत आला तरी अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे रुग्णवाहिका चालकांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रुग्णवाहिका ठप्प होऊ शकतात. त्याचा फटका रुग्णांना बसू शकतो.
राज्यात नागरिकांच्या 24 तास अत्यावश्यक सेवेसाठी 1000 रुग्णवाहिका ही तैनात केल्या आणि 108 हा हेल्पलाईन नंबरही सुरु केला. शासनाचा हा प्रकल्प भारत विकास ग्रुप अर्थात इश्ॠ या खाजगी कंपनीकडे चालवण्यासाठी दिला आहे. सुरुवातीला काही वर्षे हा प्रकल्प अत्यंत यशस्वी म्हणून समोर आला. रुग्णांना वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होत असल्याने लाखो रुग्णाचे प्राणही वाचले आहेत. मात्र, ही रुग्णवाहिका चालवणा-या चालकांनी संपाचा इशारा दिल्याने ही रुग्णवाहिका सेवा ठप्प होण्याची भीती आहे.