(अहमदाबाद)
मोदी आडनावावरून केलेल्या वक्तव्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पुनर्विचार याचिका गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे राहुल गांधी यांना सूरत सत्र न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा कायम राहणार आहे. तसेच त्यांची खासदारकी रद्दच राहील. या निकालामुळे राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष यांना मोठा झटका बसला आहे.
2019 मध्ये राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी कर्नाटकात ‘सर्व चोरांची नावे मोदी कशी,’ असे विधान केले. यानंतर गुजरातचे भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. या प्रकरणी 23 मार्च 2023 रोजी सूरतच्या सत्र न्यायालयाने राहुल गांधींना 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती. या निकालानंतर 27 मिनिटांनी त्यांना जामीन मिळाला होता. मात्र, दुसर्या दिवशी 24 मार्च रोजी अडीच वाजता केरळमधील वायनाडचे खासदार असलेल्या राहुल गांधींची खासदारकी रद्द झाली. लोकसभेच्या वेबसाईटवरूनही राहुल यांचे नाव तातडीने हटवण्यात आले होते.
या निर्णयावर फेरविचार करण्यासाठी राहुल यांनी सूरत न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. मात्र, सूरत न्यायालयाने त्यावर सुनावणी घेण्यास नकार दिला. यानंतर राहुल गांधी यांनी 25 एप्रिल रोजी गुजरात उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. गुजरात उच्च न्यायालयाने 2 मे रोजी या प्रकरणी निर्णय राखून ठेवला होता. आज गुजरात उच्च न्यायालयानेही राहुल गांधींची याचिका फेटाळली. त्यामुळे सूरत न्यायालयाने या प्रकरणात त्यांना सुनावलेली 2 वर्षांची शिक्षा कायम राहिली आहे. या शिक्षेविरोधात राहुल गांधी यांना आता सर्वोच्च न्यायालयात जावे लागणार आहे.
याबाबत निकाल देताना न्यायमूर्ती हेमंत प्रच्छक म्हणाले, राहुल यांच्यावर किमान 10 गुन्हेगारी खटले प्रलंबित आहेत. या प्रकरणाशिवाय त्यांच्यावर आणखी काही गुन्हे दाखल आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नातवानेही एक अर्ज दाखल केला आहे. कोणत्याही परिस्थितीत शिक्षा न थांबवणे हा अन्याय नाही. या प्रकरणातील राहुल यांना झालेली शिक्षा योग्य आहे. सूरत न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्याची गरज नाही.
या निकालामुळे काँग्रेसने या निकालावर नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयाच्या या निर्णयावर काँग्रेसच्या महासचिव आणि राहुल यांच्या भगिनी प्रियांका गांधी यांनी ट्विट करत यावर संताप व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, राहुल गांधी हे अहंकारी सत्तेविरोधात सत्य आणि लोकहिताची लढाई लढत आहेत. लोकहिताचे प्रश्न उपस्थित करू नये, महागाईविरोधात कुणी आवाज उठवू नये, तरुणांच्या रोजगारावर कुणी बोलू नये, शेतकर्यांच्या भल्यासाठी-हक्कासाठी लढू नये, महिलांच्या हक्काबद्दल वाचा फोडू नये, श्रमिकांच्या बाबतीत सवाल करू नये अशी या अहंकारी सत्तेची इच्छा आहे.
काँग्रेस कार्यकर्त्यांचे आंदोलन
राहुल गांधी यांची याचिका गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले. देशातील काही राज्यांत त्यांनी निदर्शने केली. महाराष्ट्रातही मुंबईत काही ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. नाना पटोले, माजी मंत्री नसीम खान, वर्षा गायकवाड यांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता. माजी मंत्री नसीम खान यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम द्रुतगती मार्गावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तर दहिसर येथे वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले.