(पणजी)
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या तेजस शिरसेने लागोपाठ दोन स्पर्धा विक्रम नोंदवत ११० मीटर्स अडथळा शर्यतीत सुवर्णपदक जिंकले आणि ॲथलेटिक्समधील दुसरा दिवस गाजवला. महाराष्ट्राची खेळाडू सेजल सिंगने २० किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्यपदक जिंकले.
तेजसने सकाळी या शर्यतीमधील प्राथमिक फेरीत १३.८० सेकंद असा स्पर्धा विक्रम नोंदवला होता. संध्याकाळच्या सत्रात त्याने १३.७१ सेकंद असा स्पर्धा विक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकले. त्याने उत्कंठापूर्ण झालेल्या शर्यतीत ओडीशाचा जीवा ग्रेशनसन (१४.१३ सेकंद) व राजस्थानचा माधवेद्र सिंग (१४.१९ सेकंद) यांना पराभूत करीत विजेतेपद पटकावले.
तेजस हा औरंगाबादचा खेळाडू असून त्याला सुरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. यंदाच्या मोसमात त्याने अनेक स्पर्धांमध्ये अव्वल दर्जाचे यश संपादन केले आहे. त्याने जूनमध्ये आयोजित करण्यात आलेला आंतरराज्य स्पर्धेतही या शर्यतीत सुवर्णपदक नोंदवले होते. यंदा मे महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या फेडरेशन चषक स्पर्धेत नोंदवलेली १३.६१ सेकंद ही त्याची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी आहे.
महाराष्ट्राची खेळाडू सेजल सिंगने २० किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकले. तिने ही शर्यत एक तास ४१ मिनिटे १३ सेकंदात पूर्ण केली. या शर्यतीमध्ये उत्तर प्रदेशची ऑलिम्पिक धावपटू प्रियांका गोस्वामीने अपेक्षेप्रमाणे सुवर्णपदक जिंकले. तिने ही शर्यत एक तास ३६ मिनिटे ३५ सेकंदात पार करीत नवीन स्पर्धा विक्रम नोंदविला. उत्तर प्रदेशची खेळाडू मुनिता प्रजापतीला कांस्य पदक मिळाले. हे अंतर पार करण्यास तिला एक तास ४२ मिनिटे २४ सेकंद वेळ लागला.