(मुंबई)
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा केल्यानंतर 24 तास उलटताच मुंबईत आपल्या नव्या कार्यालयाचे थाटामाटात उद्घाटनही केले. त्याचवेळी नाशिक येथे राष्ट्रवादीच्या कार्यालयावर ताबा मिळवण्यावरून अजित पवार आणि शरद पवार गटामध्ये तुफान राडा झाला. त्यामुळे शिवसेनेप्रमाणेच महाराष्ट्रभरातील कार्यालयांवरून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये भविष्यात संघर्ष होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे कुलाब्यात मुख्य कार्यालय आहे. मंगळवारी अजित पवार गटाने ‘प्रतापगड’ हा सरकारी बंगला ताब्यात घेऊन मुंबईत आपल्या स्वतंत्र कार्यालयाचे उद्घाटन केले. कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीत अजित पवार यांनी फुलांनी सजावट केलेल्या आपल्या नव्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन केले. यावेळी छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, संजय बनसोडे, दिलीप वळसे-पाटील, अदिती तटकरे, अनिल पाटील हे अजित पवार यांच्याबरोबर शपथ घेणारे मंत्री आणि समर्थकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उद्घाटनाआधी या कार्यालयाच्या चाव्या घेण्यावरून अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा परिसरात राडा झाल्याची माहिती आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी काल उशिरापर्यंत प्रतापगड बंगल्याची साफसफाई करत होते. साफसफाई झाल्यानंतर कर्मचारी चाव्या घेऊन गेले. ते उशिरा आल्याने कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. वैतागलेल्या काही कार्यकर्त्यांनी थेट कुलूप तोडून या बंगल्यात प्रवेश केला.
मुंबईत हा कार्यक्रम साजरा होत असताना नाशिकमध्ये नवीन आग्रा रोड येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयाचा ताबा घेण्यावरून शरद पवार गट आणि अजित पवार गट हे दोन्ही गट एकमेकांना भिडले. अजित पवार गटाने या ठिकाणी पोहोचून कार्यालयाचा ताबा घेतला होता. त्यानंतर शरद पवार समर्थकही तिथे पोहोचले. अजित पवार गटाने त्यांना कार्यालयात शिरूच दिले नाही. त्यामुळे दोन्ही गटांत वाद सुरू झाला. काही वेळातच घोषणाबाजी सुरू झाली. छगन भुजबळ समर्थक ‘छगन भुजबळ आगे बढो…अजित पवार आगे बढो’ अशा घोषणा देत होते. तर शरद पवार समर्थक कार्यालयाबाहेर ठिय्या देऊन ईडी ईडी… अशी घोषणाबाजी करत होते. तर काही कार्यकर्त्यांनी शरद पवारांचे फोटो असलेले बॅनर गळ्यात अडकवले होते.
वातावरण तापलेले पाहून पोलीस राष्ट्रवादी भवनाजवळ पोहोचले. त्यांनी बॅरिकॅड लावून दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना एकमेकांपासून वेगळे केले. परंतु शरद पवार यांच्या कार्यकर्त्यांना आत न जाऊ दिल्याने ते संतप्त झाले होते. आज राष्ट्रवादीची बैठक होती, असे ते सांगत होते. कार्यालयात जाऊ दिले जात नसल्याने त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला. शरद पवार याचे समर्थक आणि राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक गजानन नाना शेलार आणि कोंडाजी आव्हाड म्हणाले की, हे राष्ट्रवादी काँग्रेस वेल्फेअर फाऊंडेशनचे कार्यालय आहे. फाऊंडेशनने आम्हाला या ठिकाणी बैठक घेण्यासाठी परवानगी दिली आहे. या ठिकाणी शरद पवार यांच्या समर्थनार्थ बैठक घेऊ शकता, असे सांगितले गेले. कुठल्याही परिस्थितीत शरद पवारांना त्रास देणे योग्य नाही. आम्ही शरद पवारांसोबत आहोत. अजित पवारांचा आम्हाला आदर आहे. परंतु त्यांनी शाहू-फुले आंबेडकरांचे विचार घेऊन काम केले पाहिजे होते, त्यामुळे आम्ही शरद पवार समर्थक आहोत. आज नाही तर उद्या आम्ही कार्यालय ताब्यात घेणार म्हणजे घेणारच, अशी भूमिका त्यांनी मांडली.