( मुंबई / प्रतिनिधी )
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या संमतीने पक्षाचे राष्ट्रीय स्तरावरील सर्व विभाग आणि सेल बरखास्त करण्यात आले आहेत, अशी माहिती खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली. तसेच, नवीन कार्यकारिणी जाहीर होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस वगळता राष्ट्रीय स्तरावरील सर्व विभाग आणि कक्ष तातडीने बरखास्त केले आहेत, असे ट्विट राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.
राष्ट्रवादीचे एक पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यात कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. विविध निवडणुकांच्या तोंडावर जुन्या पदाधिकाऱ्यांना बदलून नव्या नियुक्त्या केल्या जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे. तसेच, सदर निर्णय महाराष्ट्राला लागू नाही, असेही पटेल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.