(मुंबई)
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवार यांच्या उपस्थितीत आज मुंबईत पक्षाचा पहिलाच मेळावा झाला. या मेळाव्याला कार्यकर्त्यांची तुडुंब गर्दी होती. शरद पवार यांनी यावेळी सर्वांना मार्गदर्शन केलं. अजित पवार आणि गटाच्या नेत्यांनी आजच मुंबईत झालेल्या मेळाव्यात केलेल्या आरोपांना आणि आक्षेपांना शरद पवार यांनी सविस्तर उत्तरं दिली.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, 23 वर्षापूर्वी राष्ट्रवादीचा जन्म झाला. राष्ट्रवादीने अनेक नेते तयार केले. संपूर्ण देशाचं आजच्या बैठकीकडे लक्ष आहे. तुमच्या मदतीने, कष्टाने पक्षबांधणीत यशस्वी झालो. आम्ही सर्वजण सत्ताधारी पक्षात नाही, लोकांमध्ये आहोत. लोकशाही टिकवायची असेल तर संवाद महत्वाचा आहे. मात्र देशात संवाद राहिलेला नाही. कार्यकर्त्यांनी कष्टानं पक्ष उभा केला. विरोधकांना एकत्र करायचं काम सुरु आहे. देशाचे नेते म्हणून बोलताना सभ्यता बाळगावी, असे शरद पवार म्हणाले.
आपलं नाणं खोटं आहे याची खात्री आमच्या मित्रांना आहे. त्यामुळेच त्यांच्या बैठकीत आणि मेळाव्यात माझा मोठा फोटो लावण्यात आला असं वक्तव्य करत शरद पवार यांनी अजित पवार यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “आज काही लोकांनी भाषणं केली. बोलताना सांगत होते शरद पवार आमचे गुरु आहेत. आमच्या मित्रांचा मेळावा झाला त्यात फोटो पाहिले का? सगळ्यात मोठा फोटो होता माझा. मुंबईत पोस्टर लावली की फोटो माझा. त्यांना माहित आहे आपलं नाणं चालणार नाही. त्यामुळे चालणारं नाणं घेतलं पाहिजे. त्यांचं नाणं खरं नाही ते खणकन वाजणार नाही अडचण नको म्हणून त्यांनी माझा फोटो वापरला आहे. पांडुरंगाच्या दर्शनाला बडवे जाऊ देत नाहीत असाही आरोप झाला. कसले बडवे? पांडुरंगाच्या दर्शनाला जायचं असेल तर कुणी अडवत नाही. पांडुरंग म्हणायचं, गुरु म्हणायचं आणि आमच्याकडे दुर्लक्ष झालं म्हणायचं ही गंमतीची गोष्ट आहे असं मला वाटतं” असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
देशात जे जे पक्ष भाजपबरोबर गेले, त्यांचा इतिहास बघा. अकाली दलात फूट पाडली. तेलंगण, आंध्रमध्ये हेच केलं. बिहारमध्ये नितीश कुमारांना पुन्हा वेगळा विचार करणं भाग पडलं. भाजपसोबत काही महिने ठीक चालतं, मग सहकाऱ्याला उद्ध्वस्त करणं हेच सूत्र भाजपचं आहे. आज आपल्यातल्या काही लोकांनी निर्णय घेतला असेल तर ठीक आहे. त्यांनी आमच्याशी चर्चा केली असती तर बरं झालं असतं, पण ही गोष्ट लक्षात ठेवा की इतर पक्षांच्या बाबतीत जे घडलं, त्यापेक्षा वेगळं घडणार नाही, असा इशाराही पवार यांनी यावेळी दिला.
यापुढे बोलताना ते म्हणाले की, आपल्या पक्षाचं चिन्ह कुठंही जाणार नाही, जाऊ देणार नाही. पण चिन्ह हे राजकारण ठरवत नाही. माझ्या राजकीय आयुष्यात अनेकदा आमची निवडणूक चिन्हं गेली. कुठलंही चिन्ह असलं तरी जोपर्यंत सामान्य माणसाच्या मनात पक्षाची भूमिका आहे, तोपर्यंत काही काळजी करण्याचं कारण नाही.