(रत्नागिरी)
दापोलीच्या कृषी महाविद्यालयातील ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम ( रावे) अंतर्गत कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांच्या “कृषी रत्न” आणि “कृषी पुत्र” गटांनी रत्नागिरी तालुक्यातील खानु गावात सौ जयश्री सुतार यांच्या शेतावर नाचणी लागवडीचे प्रात्यक्षिक आयोजित केले होते. या प्रात्यक्षिकात सुतार यांच्या दोन गुंठे प्रक्षेत्रावर नाचणीच्या गावठी वाणाची रोपे “ठोंबा ” पद्धतीने लावण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना लागवडीचे अंतर, खत व्यवस्थापन तसेच तण नियंत्रण याविषयी शास्त्रोक्त माहिती दिली.
“रावे” कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालयाचे कृषीदूत नुकतेच खानु गावात दाखल झाले आहेत. पुढील 18 आठवडे हे विद्यार्थी खानू गावात राहून शेती आणि ततसंबंधी आधुनिक तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके आयोजित करणार आहेत. त्याचबरोबर विविध विस्तार शिक्षण पद्धतींचा वापर करून तंत्रज्ञान प्रसाराचे काम करणार आहेत. या प्रात्यक्षिकाच्या आयोजनासाठी संपर्क शेतकरी श्री संदीप कांबळे आणि ग्रामस्थ अविनाश कुलकर्णी यांनी मदत केली. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमांचे सर्वांनीच कौतुक केले आणि पुढील काळात अशा प्रकारच्या सर्व कार्यक्रमात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर प्रमोद सावंत, रावे कार्यक्रम समन्वयक डॉक्टर विठ्ठल नाईक तसेच केंद्रप्रमुख डॉक्टर आनंद हणमंते, कार्यक्रम अधिकारी डॉक्टर सुदेश चव्हाण, व तसेच विषय विशेषज्ञ डॉक्टर वीरेश चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित यांचे स्वागत व प्रास्ताविक कुमार पुष्कर कुलकर्णी यांनी केले तर कुमार कौशिक पाल याने आभार व्यक्त केले. प्रात्यक्षिकासाठी खानू परिसरातील 5 शेतकरी उपस्थित होते.