(अयोध्या)
देशासाठी ऐतिहासिक मानला जाणारा राम मंदिर लोकार्पण सोहळा 22 जानेवारी रोजी संपन्न होणार आहे. या निमित्ताने अयोध्यासह देशभरात दिवाळी साजरी करण्यात येणार आहे. गुरुवारी राम मंदिरात विधींची तिसरा दिवस होता, यावेळी रामलल्लाची मूर्ती मंदिराच्या ‘गर्भगृह’मध्ये ठेवण्यात आली आहे. राम मंदिराचे बांधकाम हे पहिल्या मजल्याशी संबंधित आहे. यात राम दरबार म्हणून ओळखले जाईल, तर दुसरा मजल्यावर विविध विधी आणि समारंभांसाठी आहे.
रामलल्लाचे आगमन झाल्यानंतर संपूर्ण अयोध्यानगरीचे वातावरण भक्तीमय झाले होता. अयोध्येत गुरुवारी दुपारी 12.20 वाजता रामलल्लाच्या मूर्ती विधीवध गर्भगृहात ठेवण्यात आली. यावेळी ‘जय श्री राम’च्या जयघोषात मूर्ती क्रेनच्या मदतीने मंदिराच्या गर्भगृहात ठेवण्यात आली. तसेच अयोध्येत चार दिवस आधीच श्री राम भक्त दाखल होण्यास सुरुवात झाली असून अयोध्येतील तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. देशभरातील प्रमुख साधू-महंतांना या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. ज्यामुळे या सोहळ्यासाठी देशातील सर्वच प्रमुख साधू आणि महंत उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्रातील काही प्रमुख साधू-महंतांना सुद्धा या ऐतिहासिक सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. त्यासाठी आजच राज्यातील सर्व प्रमुख साधू-महंत अयोध्येच्या दिशेने रवाना झाले आहेत. काल (ता. 18 जानेवारी) गुरुवारी सकाळी नाशिक येथून राज्यातील प्रमुख साधू-महंत अयोध्येकडे निघाले आहेत. संकेश्वर व करवीर पीठाचे शंकराचार्य यांच्यासह राज्यभरातील साधू-महंत अयोध्येच्या दिशेने रवाना झाले आहेत. दरम्यान, 22 जानेवारीला राम मंदिरातील गर्भगृहात रामलल्लाच्या मूर्तीचा अभिषेक होणार आहे. राम मंदिर सोहळ्यासाठी आतापर्यंत 11 हजारांहून अधिक पाहुण्यांना निमंत्रण दिले आहे. अयोध्येत बुधवारी ‘कलश पूजन’ करण्यात आले. मूर्ती ज्या मार्गावरुन नेली जात होती, त्या मार्गांवर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मूर्ती स्थापित करण्यापूर्वी ४ तास पूजा-अर्चना केली गेली. यावेळी मूर्तिकार योगीराज आणि साधु-संत मंदिरात उपस्थित होते. मूर्ती सध्या झाकली आहे. २२ जानेवारी रोजी प्राण प्रतिष्ठापनेनंतर मूर्ती खुली केली जाईल. रामलल्लाच्या मूर्तीचे वजन जवळपास २०० किलो दरम्यान असून उंची ५१ इंच आहे. गर्भगृहात स्थापित करण्यात येणाऱ्या मूर्तीचे वजन २०० किलो अशी वजनदार असल्याने त्याजागी रामलल्लाची १० किलो वजनाच्या चांदीच्या मूर्तीची मंदिर परिक्रमा करण्यात आली आहे.