( खेड )
खेड येथे रविवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. यावेळी ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी भाजपवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांच्या या सभेआधी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यावेळी त्यांनी भाजपसह शिंदे गटाचे माजी आमदार रामदास कदम यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
रामदास कदम भंपक आहेत. त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला असून त्यांच्या मुलाचा पराभव केल्याशिवाय गप्प बसणार नाही असं विधान आमदार भास्कर जाधव यांनी भाषणादरम्यान केलं आहे. तसेच भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील निशाणा साधला. खेड मधील गोळीबार मैदान येथे आयोजित सभेत ते बोलत होते
मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे तीन वेळा रत्नागिरीत आले. परंतु, त्यांनी रत्नागिरीकरांसाठी काय केलं. मुख्यमंत्र्यांनी साडेआठशे कोटी रूपयांच्या कामांचं उद्घाटन केलं. परंतु, त्याला आधी मंजुरी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना दिली आहे, असा दावाही भास्कर जाधव यांनी केला. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांचा खासदार निधीचा पाच कोटी रूपयांचा फंड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोठवल्याचा आरोपही भास्कर जाधव यांनी यावेळी केला.
“देशाची घटना संपवली जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जो माणूस आयुष्यभर कुणाखाली वाकला आणि झुकला नाही, त्यांनी आपल्यासमोर येथे साक्षात दंडवत घातला होता, असे म्हणत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी रत्नागिरीसाठी काय-काय केलं याची यादीच भास्कर जाधव यांनी यावेळी वाचून दाखवली.
कोरोनासारख्या संकटाच्या काळात रामदास कदम मतदारसंघात फिरले नाहीत. त्यांनी मतदारसंघासाठी काय काम केलं हे सांगावं? असं आवाहन भास्कर जाधव यांनी दिले.