(संगलट-खेड/इक्बाल जमादार)
शिवसेना नेते माजी मंत्री रामदासभाई कदम यांनी ‘जागर कदम वंशाचा’ या पुस्तकाचे लिखाण करून तरूण पिढीला प्रेरणा मिळेल असे प्रतिपादन करून सामाजिक वा राजकीय क्षेत्रातून निवृत्ती घेऊ नये असे मत शिवसेना नेते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी जागर कदम वंशाचा या पुस्तकाच्या प्रकाशन सोहोळयानिमित्त जामगे येथील कोटेश्वरी मानाई देवीच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.
यावेळी गृहराज्यमंत्री ना. शंभूराजे देसाई, खा. गजानन किर्तीकर, आ. जयंत पाटील, ना. उदय सामंत, इतिहासकार सतिश कदम, आ. योगेश कदम, सिध्देश कदम, प्रकाश सुर्वे, केशवराव भोसले, उद्योजक नितीन विचारे आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना नेते माजी मंत्री रामदासभाई कदम होत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाला मान्यवर उपस्थितांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यावर जागर कदम वंशाचा या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा शिवसेना नेते रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखाली व सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना ना . एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेते माजी मंत्री रामदास कदम यांचे कार्य जनमानसाच्या हृदयात ठसा उमटविणारे तर आ. योगेशदादा कदम यांचेही कार्य प्रशंसनीय आहे. ते पुढे म्हणाले की, जागर कदम वंशाचा हा इतिहास जागृत करण्याचा आणि आजच्या तरूणांना प्रेरणादायी देणारा आहे. त्यांचे लेखन रामदास कदम यांनी करून त्यांनी लेखकाचा पैलू सर्वसामान्यांसमोर मांडला आहे.
कदम वंशाचा इतिहास हा कदंब राज्य अस्तित्वात असल्यापासूनचा आहे. अफगाणिस्तान मधील कंदाहारपर्यंत हे साम्राज्य त्याकाळी पसरले होते. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, तेलंगणा, गोव्यापर्यंत या राज्याच्या सीमा विस्तारल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात देखील कदम वंशाने महाराजांना मोलाची साथ दिली होती, हा सगळा दैदीप्यमान इतिहास या पुस्तकाद्वारे मांडण्यात आला आहे. हे पुस्तक भावी पिढ्यांना नक्की दिशादर्शक ठरेल अशी अपेक्षा यासमयी उपस्थितीतांना संबोधित करताना व्यक्त केली.
वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय असलेल्या रामदास भाईंनी आयुष्यभर संघर्ष करून राज्याचा विरोधी पक्षनेता, पर्यावरण मंत्री अशी मानाची पदे भूषवली आहेत. कदम वंशाचे नाव त्यांनी नव्या उंचीवर पोहोचवले असल्याचे यासमयी बोलताना आवर्जून स्पष्ट केले.
जागर कदम वंशाचा हे पुस्तक ग्रंथालयात ठेवण्यात येईल – ना . उदय सामंत
जागर कदम वंशाचा पुस्तक प्रकाशन व धर्मवीर आनंद दिघे यांचा सिनेमा प्रकाशन हा एक योगायोग आहे. जागर कदम वंशाचा हे पुस्तक महाराष्ट्रातील १२ हजाराहून अधिक ग्रंथालयात ठेवण्यात येईल. योगेश कदम यांनी तर माझ्या गावाकडील २५ वर्षे रखडलेल्या रस्त्याचे काम अवघ्या ३ वर्षात करून आपल्या प्रभावीशाली कार्याची चुणुक दाखवली. २००४ ते २०० ९ मध्ये शिवसेना आमदारांची वज्रमुठ बांधण्याचे काम रामदासभाई कदम यांनी केले. शिवसेना नेते रामदास कदम यांच्यावर विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी टाकल्यावर शिवसेना आमदारांनी एकत्र वज्रमुठ बांधल्याचे काम करून विधीमंडळात ठसा उमटविला. तर दुष्काळीग्रस्त भागाचा दौरा करून दुष्काळग्रस्त भागातील जनतेला शिवसेनेच्यावतीने मदत कार्य देखील धडाकेबाज करून शिवसेनेच्या समाज कार्याची छाप जनमानसात उमटविल्याचे काम केले. रामदास कदम यांनी जागर कदम वंशाचा हा पुस्तकाचे लेखन करून कदमांच्या इतिहासाची पाने उलगडून तरूण पिढी समोर आदर्श निर्माण करून स्व. बाबासाहेब पुरंदरे यांच्या सारख्या ज्येष्ठ इतिहासकारचा आशिर्वाद या पुस्तकाला लाभला आहे.
जागर कदम वंशाचा :समाजाला दिशा देणारा : खा . गजानन किर्तीकर
जागर कदम वंशाचा या रामदासभाई कदम लिखित पुस्तक हे समाजाला दिशा देणारे आहे. तर इतिहासाचा ठेवा ठेवणारा आहे असे सांगून रामदास कदम हे कांदिवलीचे शाखाप्रमुख ते विरोधी पक्षनेते याचा प्रवास देखील तडफदार आणि हृदयात ठसा उमटविणारा आहे. ते शिवसेनाप्रमुखांच्या विश्वासातील सहकारी शिवसेना नेते होते. आपल्या ३५ वर्षांच्या कारर्दीतील भरीव संघटनात्मक काम केले आहे. कांदीवलीमध्ये पहिले धडाडीचे शिवसेनेचे शाखाप्रमुख होते.
अभ्यासू व्यक्तीमत्व रामदासभाई कदम : आ . जयंत पाटील
शिवसेना नेते माजी मंत्री रामदासभाई कदम यांनी जागर कदम वंशाचा या पुस्तकाचे लेखन करून आपल्या अभ्यासू व्यक्तीमत्वाचा पैलू साहित्यामध्ये उमटविला आहे. विधीमंडळात तर आपल्या अभ्यासुवृत्तीचा ठसा उमटविला आहे. सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम केले आहे. तर विधीमंडळात प्रभावीपणे आपल्या वक्तृत्वाने ठसा उमटविला आहे.
अशा प्रकारे ‘जागर कदम वंशाचा’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहोळा मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण व आनंदमय वातावरणात पार पडला. या सोहळ्याचे सुत्रसंचलन माजी नगरसेवक संजय मोदी यांनी केले.