(संतोष पवार/ जाकादेवी)
मुंबईतील प्रसिद्ध भायखळा येथील वीरमाता जिजामाता भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयात ऐन दिवाळीच्या सुट्टीमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी वाढली असून तिकीटासाठी अक्षरशः झुंबड उडत आहे .सिक्युरिटी गार्डची देखील तारांबळ उडताना अनेकांनी अनुभवली. दिवाळी फेस्टिव्हलमध्ये पर्यटकांनी मंगळवारी विक्रमी गर्दी केली होती.
प्रसिद्ध राणीची बाग येथे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होतात. हे उद्यान व प्राणी संग्रहालय अतिशय प्रसिद्ध असून मुलांच्या सुट्टीच्या कालावधीत अनेक पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करतात. यामध्ये आबालवृद्ध मोठ्या संख्येने असतात. यावेळी दिवाळी फेस्टिव्हलमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक पर्यटकांनी दिवाळीच्या दिवशी मोठी गर्दी केली होती. तिकीट चेकींगसाठी तिकीट चेकरही पुढे येऊ शकले नाहीत. एवढी मोठी रांग होती. अजूनही काही दिवस पर्यटन वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन येथील व्यवस्थापक कमिटीने बुधवारी साप्ताहिक सुट्टी न देता हे उद्यान व प्राणिसंग्रहालय सर्व नागरिकांसाठी खुले ठेवण्यात आले आहे. या प्राणिसंग्रहालय बुधवार ऐवजी पुढील दिवशी हे उद्यान बंद ठेवण्यात येणार आहे. या प्राणिसंग्रहालयात लक्षवेधी ठरणारा सिंह पाहायला मिळाला नाही. या प्रसिद्ध संग्रहालयात काही प्राणी वाढविण्यासाठी प्रशासनाने आग्रह धरावा,असे मत काही पर्यटकांनी आवर्जून बोलून दाखवले. जिजामाता उद्यान व प्राणिसंग्रहालय परिसर टापटीप व पर्यटकांसाठी सोयींयुक्त ठेवण्यात आला आहे.