(मुंबई)
महाराष्ट्राच्या भावी मुख्यमंत्र्यांच्या यादीत आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावाची भर पडली आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवतीर्थाबाहेर “महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री राज ठाकरे” असे लिहिलेले बॅनर लावले आहेत. या बॅनरवर आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
राज ठाकरे यांचा वाढदिवस १४ जून रोजी आहे. त्या निमित्ताने दादरच्या शिवतिर्थावर मनसे कार्यकर्त्यांनी बॅनर्स लावले आहेत. त्यावर महाराष्ट्र राज्याचे भावी मुख्यमंत्री राजसाहेब ठाकरे, वाढदिवस आमच्या देवाचा, वाढदिवस शिवतीर्थ नावाच्या न्यायालयातील सरन्यायाधीशांचा, राज्याला एकवेळ मुख्यमंत्री नसला तरी चालेल, पण प्रत्येक राज्यात किमान एकतरी राजसाहेब ठाकरे नक्की असावेत, हिंदू जननायक श्रीमान राजसाहेब ठाकरे, अशी विविध विशेषणे लावत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. गुढी पाडव्याला मनसेचा मेळावा होता. त्यावेळीसुद्धा राज ठाकरे भावी मुख्यमंत्री असे बॅनर लावण्यात आले होते.
दरम्यान, राज ठाकरे यांनी वाढदिवसानिमित्ताने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नेत्यांना आवाहन केले आहे की, वाढदिवशी भेटायला येताना कोणीही पुष्पगुच्छ, मिठाई अथवा कोणतीही भेटवस्तू आणू नये. तुम्हाला अगदीच काही द्यावे असे वाटले तर येताना झाडाचे रोप किंवा शैक्षणिक साहित्य, वह्या आणाव्यात. तुम्ही दिलेली झाडांची रोपे आपण विविध संस्थांना वृक्षारोपणासाठी, शैक्षणिक साहित्य गरजू विद्यार्थ्यांना देण्यात येईल.