महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांचा पहिल्यापासून तीव्र विरोध आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याप्रकरणी भाजप खासदारांची खरडपट्टी काढली असे मनसेकडून अनेक माध्यमांद्वारे सांगितले जात असले तरी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांचा प्रखर विरोध कायम आहे.
भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी उत्तर प्रदेशातील गोंडामध्ये राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध दर्शवित रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले आहे. आपण आता अपमान सहन करणार नसून राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, अन्यथा त्यांना उत्तर प्रदेशात पाय ठेवू देणार नसल्याचे बृजभूषण सिंह यांनी ठणकावले आहे.
भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी उत्तर प्रदेशातील नागरिकांनीही राज ठाकरेंना विरोध करण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, की मी सर्वप्रथम उत्तर भारतीय आहे. राज ठाकरेंनी आजपर्यंत उत्तर भारतीयांना अपशब्द बोलल्याचा हिशोब द्यावा लागेल. २००८ पासून त्यांनी उत्तर भारतीयांना कायम त्रास दिला आहे. मजुर तसेच परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही त्यांनी मारहाण केली होती. आमच्या यूपीमध्ये यायचे असेल, तर माफी मागावीच लागेल. आपल्याला मराठ्यांचे समर्थन प्राप्त असून, मी छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानतो असे बृजभूषण शरण सिंह म्हणाले.