(मुंबई)
२००५ ते २०१० या काळात विविध साखर कारखाने, सुतगिरण्या उद्योगांना नियमबाह्य कर्जपुरवठा करून राज्य सहकारी बँकेत झालेल्या २५ हजार कोटींचा घोटाळा प्रकरणात आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची एंट्री झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याविरोधात राज्य बँक घोटाळा प्रकरणी अण्णा हजारे पुन्हा मैदानात उतरले आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या कथीत २५ हजार कोटींच्या घोटाळया प्रकरणी आज कोर्टात सुनावणी होणार आहे. ज्येष्ठ विधीज्ञ सतीश तळेकर हे अण्णा हजारे यांची बाजू मांडणार आहेत.
दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळयाची चौकशी बंद करण्यात आली होती. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने हे प्रकरण पुन्हा उघडून घोटाळयाची अधिक चौकशी करायची असल्याचे मुंबई सत्र विशेष न्यायालयात सांगितले. अजित पवार आणि ७६ जणांविरुद्ध पुढील कारवाई करण्यासाठी ठोस पुरावे सापडले नसल्याचे सांगून प्रकरण बंद करण्याची मागणी करणारा अहवाल दोन वर्षांपूर्वी न्यायालयात सादर करण्यात आला. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागातर्फे दोन वर्षांपूर्वी १० सप्टेंबर २०२० ला हा अहवाल न्यायालयात देण्यात आला होता.
या अहवालाविरोधात मूळ तक्रारदार सुरेंद्र अरोरा यांनी निषेध याचिका दाखल केली होती. दुसरीकडे ईडीनेही त्यांच्या अहवालात या प्रकरणात पुरावे असल्याचा दावा केला होता. निषेध याचिका आणि ईडी अहवालाच्या आधारे प्रकरणाचा पुढील तपास सुरू करण्यात आल्याचे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कोर्टात सांगितले होते