(मुंबई)
महाराष्ट्रात 2019 मध्ये राष्ट्रपती राजवटीची कल्पना शरद पवार यांचीच होती, असा खुलासा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. अजित पवार महायुतीत सहभागी झाले, त्यावेळी शरद पवार यांची भूमिका काय होती, यावरही फडणवीस यांनी भाष्य केले. उद्धव ठाकरे यांनी 2019 मध्ये आमचा विश्वासघात करून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी चर्चा सुरू केली, तेव्हा राकाँच्या काही नेत्यांनी आम्हाला त्रिपक्षीय सरकार नको, आम्ही तुमच्यासोबत येऊ इच्छितो, असा प्रस्ताव मला दिला होता. तेव्हा शरद पवार यांनीच अजित पवारांना सर्व अधिकार दिले होते. राज्यात राष्ट्रपती राजवट लावून नंतर भाजपा-राकाँचे सरकार स्थापन करण्याची कल्पनाही शरद पवार यांचीच होती, असेही फडणवीस यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रिमंडळाच्या बैठकांनाही येत नाहीत, याबाबत विचारले असता, फडणवीस म्हणाले की, आज राजकारणातील परिस्थिती इतकी बिकट आहे की, आपण आजारी पडलो, तर त्याचीही बातमी बनते आणि त्यातून विविध प्रकारांचे तर्क वितर्क काढले जातात. मी त्यांच्याशी बोललो, त्यावेळी त्यांचा आवाजही बाहेर येत नव्हता. आमचे दिल्लीला जाणे आधीच ठरले होते. राज्य सरकारला केंद्राशी समन्वय ठेवावा लागतो, त्यामुळे जावे लागते, असे त्यांनी सांगितले.
एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहणार
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बदलणार नाही. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री आहेत आणि तेच या पदावर कायम राहील, अशी स्पष्ट ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली. लोकसभेची असो किंवा विधानसभेची असो, राज्यातील सर्व निवडणुका शिंदे यांच्याच नेतृत्वात लढल्या जातील. मुख्यमंत्री बदलण्याची शक्यता आहे, हा विचार तुम्ही मनातून काढून टाका, असे ते म्हणाले. मी देखील वकील आहे आणि एक वकील म्हणून सांगतो की, शिवसेना प्रकरणात सभापतींपुढे शिंदे गटाची बाजू अधिक मजबूत आहे. शिंदे यांच्या अपात्रतेच्या बातम्या शरद पवार किंवा ठाकरे यांच्या गटाकडून वारंवार पसरवल्या जातात. त्यांना आपल्या जवळ असलेल्या लोकांना टिकवून ठेवायचे असल्यामुळे ते अशा खोट्या बातम्या पेरत असतात. सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाविरुद्धचा खटला शिवसेनाच जिंकणार आहे, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.