(मुंबई)
कोकण, मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत गेले काही दिवस पावसाची संततधार सुरू असून आजही पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे ठिकठिकाणी नद्यांची पाणीपातळी वाढली, धरणे ओसंडून वाहू लागली, रस्ते-पूल वाहून गेले, शेतात पाणी शिरले, आणि जनजीवन विस्कळीत झाले. भारतीय हवामान विभागाने मुंबईसह, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. पुढील काही तासांत याठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पालघर आणि ठाणे जिल्ह्यालाही हवामान खात्याने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. पावसाच्या रेड अलर्टनंतर आज मुंबई, रत्नागिरी व चंद्रपूर जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेक दिवस दडी मारलेल्या पावसाने जुलै महिन्यात कसर भरून काढली. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकण किनारपट्टी, विदर्भातील काही जिल्हे आणि मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह इतर काही भागात 28 जुलैपर्यंत अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, मुंबई, रत्नागिरी, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये बुधवारी रात्री 8 वाजल्यापासून आज गुरुवारी दुपारपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. त्यामुळे मुंबई, रत्नागिरी व चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून सरकारी आणि खासगी शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी सांगितले.
मुंबई, कोकणासह राज्यातील इतर भागांमध्ये पावसाची संततधार सुरु आहे. हवामान विभागाने गुरुवारी ५ जिल्ह्यांना रेड अलर्ट तर ७ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुढील पाच दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पुढील ५ दिवसांत महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
IMD issues 'red alert' for Mumbai, Raigad, Ratnagiri and Sindhudurg districts today: IMD Mumbai issues forecast at 8:00 PM IST pic.twitter.com/imxkk2ezEf
— ANI (@ANI) July 26, 2023
रेड आणि ऑरेंज अलर्ट जिल्हे –
रेड अलर्ट असलेल्या पुणे, सातारा, रत्नागिरी, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यात ऑरेंज अलर्टमुळे मुसळधार पावसाची शक्यता आहे.