(मुंबई)
मुंबईसह देशभरातील तापमानात प्रचंड वाढ होत आहे. या वाढत्या तापमानामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. अशातच आणखी उकाडा वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. राज्यात भयंकर उष्णतेची लाट वाहणार असल्याचा इशार हवामान विभागाकडून देण्यात आला असून, पुढील ४८ तासांत दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागात व संलग्न भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तसंच, पुढील पाच दिवस विदर्भाच्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
देशातील ७० टक्के भागांत उष्णतेची लाट सुरू आहे. बुधवारी देशातील ३३ शहरांत तापमान ४४ अंशाच्या वर होते. यात ७ शहरांत तापमान ४५ अंशाहून अधिक होते. दरम्यान, महाराष्ट्रात २५ हून अधिक शहरांत पारा ४१ अंशाच्या वर सरकला होता. दरम्यान आता राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये ३० एप्रिलपर्यंत लाट कायम राहील. विदर्भात मात्र यानंतरही ही लाट कायम राहणार आहे. या काळात कमाल तापमान सरासरीपेक्षा १ ते ३ अंश वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, बिहार, झारखंड या राज्यांत एप्रिलच्या अखेरच्या तीन दिवसांत तापमान वाढते राहील. १ मे रोजी उष्णतेच्या लाटेचा पीक असेल. या राज्यांत अनेक भागांत तापमान ४७-४८ अंशावर जाण्याची शक्यता आहे. २ मेपासून मात्र तापमानात घट होईल.